बेळगाव लाईव्ह :बेळगाव ग्रामीण भागातील खेळाडूंनी नेहमीच आपल्या जिद्दीच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात ठसा उमटवला आहे. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा बी. के. कंग्राळी गावातील हनमंत केपन्यावर या १७ वर्षीय पैलवानाने आणून दिला आहे. औरंगाबाद (महाराष्ट्र) येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत हनमंतने आपल्या प्रतिस्पध्यांना चितपट करत सुवर्णपदकावर (Gold Medal) आपले नाव कोरले.
या ऐतिहासिक विजयाची शाई वाळते न वाळते तोच, त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अवघ्या आठ दिवसांच्या कालावधीत हनमंतची एशियन चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड झाली असून, तो आता ‘अंडर-१७’ गटात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
हनमंतच्या या दैदिप्यमान यशामुळे बी. के. कंग्राळी परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. त्याच्या यशाची दखल घेत गावातील परमेश्वर आखाड्याच्या पंच कमिटीने, स्थानिक नागरिक आणि सहकारी पैलवानांच्या उपस्थितीत त्याचा विशेष सत्कार सोहळा आयोजित केला होता.

यावेळी त्याला हार आणि शाल घालून सन्मानित करण्यात आले, तर विजयाचा आनंद साखर वाटून आणि त्याला मिठाई भरवून साजरा करण्यात आला. एका सामान्य कुटुंबातून आणि ग्रामीण आखाड्यातून तयार झालेला हा पैलवान आता आशियाई पातळीवर देशाचे नाव उंचावण्यासाठी सज्ज झाला आहे.
पंच कमिटी आणि बी. के. कंग्राळी ग्रामस्थांनी त्याच्या आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.




