बेळगाव लाईव्ह ;जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, पांडुरंग हरी नामाच्या जयघोषात बेळगाव शहर-उपनगरात आज रविवारी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात भक्तीभावाने साजरी करण्यात आली.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने खडेबाजार श्री विठ्ठल मंदिर, नामदेव देवकी संस्थेचे नामदेव मंदिर, शहापूरच्या श्री विठ्ठल देव गल्लीतील श्री विठ्ठल मंदिर, वडगाव येथील श्री विठ्ठल मंदिर अशा शहरातील ठिकठिकाणीच्या श्री विठ्ठल मंदिरांची रंगरंगोटी आणि खास सजावट करण्यात आली होती. त्याचप्रमाणे मंदिरांमध्ये आज सकाळी विशेष पूजा, अभिषेक वगैरे धार्मिक विधी आणि त्यानंतर दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक विठ्ठल मंदिराच्या ठिकाणी सकाळपासून माऊलीच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी होऊन लांबच्या लांब रांगा लागल्याचे पहावयास मिळत होते. देवदर्शन घेणाऱ्या भक्तांना विशेष प्रसादाचे वाटप केले जात होते. भक्तांच्या सोयीसाठी श्री विठ्ठल मंदिरांच्या परिसरात पूजेच्या साहित्यांचे स्टॉल मांडण्यात आले होते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने गेल्या दोन दिवसांपासून प्रत्येक विठ्ठल मंदिरामध्ये स्वच्छता आणि सजावटीचे काम सुरू होते.
वडगाव येथील श्री विठ्ठल मंदिर येथे देखील आषाढी एकादशी विविध कार्यक्रमांद्वारे मोठ्या भक्तीभावाने साजरी करण्यात येत आहे. मंदिरामध्ये देव दर्शनासाठी सकाळपासूनच भक्तांची रीघ लागली असून त्यांच्यासाठी विशेष प्रसाद वितरित केला जात आहे. सदर मंदिरासंदर्भात बेळगाव लाईव्हला माहिती देताना श्री विठ्ठल मंदिर विकास समितीच्या एका सदस्याने सांगितले की, वडगावचे हे श्री विठ्ठल मंदिर पूर्वी खाजगी मालकीचे होते. संबंधित मालकाने 15 वर्षांपूर्वी मंदिराची जागा विकण्यास काढली होती.
मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हस्तक्षेप करून विक्री होऊ न देता मंदिराची उभारणी केली आणि ते सार्वजनिकांसाठी खुले केले. त्यानंतर गेल्या पंधरा वर्षापासून या मंदिरात नित्य नियमाने पूजाअर्चा, काकडा, आरती, भजन वगैरे कार्यक्रम होत असतात. आज आषाढी एकादशी निमित्त सकाळी श्री विठ्ठलाला विशेष अभिषेक घालण्याबरोबरच आरती, भजन वगैरे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या खेरीज आता दिवसभर विष्णुसहस्त्रनाम, श्री विठ्ठलाचे अभंग, गाणी असे कार्यक्रम सुरू असून सायंकाळी वारकरी संप्रदायातर्फे भजन होणार आहे. आमच्या या मंदिरात दररोज सायंकाळी 7 ते 9 किंवा 8 ते 9 या वेळेत वारकरी संप्रदाय भजन सेवा करत असतो. वडगावमध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय असून त्यांना दररोज पांडुरंगाचे दर्शन घेऊन त्याची सेवा करता यावी म्हणून या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे.