बेळगाव लाईव्ह : जंगल भागात राहणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते अश्याच पद्धतीने एका युवकाला झाडावर चढून जीव वाचवावा लागला आहे. गवी रेडे मागे लागताच घाबरून पळत सुटलेल्या दिगंबर याने एका झाडावर चढून आपला जीव वाचविला. एखाद्या हॉलिवूड चित्रपटाला साजेल असा थरारक क्षण त्याच्या जीवावर बेतल्याची घटना शनिवारी खानापूर तालुक्यात घडली आहे.
केवळ एका नव्हे तर तीन प्राण्यापासून त्याने सुटका करवून घेत स्वतःचा जीव वाचवला आहे.
खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्याच्या कुशीत वसलेल्या पास्टोली गावातील 35 वर्षीय युवक दिगंबर बळवंत पाटील याला एकाच वेळी जंगली अस्वल, गवीरेडे आणि गायीचा थरारक सामना करावा लागल्याची घटना नुकतीच घडली आहे. दैव बलवत्तर म्हणून त्यामधून दिगंबर आपला जीव कसाबसा वाचू शकला.
याबाबतची माहिती अशी की, पास्टोली येथील युवक दिगंबर बळवंत पाटील याची तब्येत बरी नसल्याने तो आपली दुचाकी गाडी घेऊन खानापूरला डॉक्टरांना भेटण्यासाठी निघाला होता. त्यावेळी कोंगळा गावापासून काही अंतरावर पाठवली -गव्हाळी रस्त्याकडे जाणाऱ्या लाकडी साकवच्या अलीकडे जंगली अस्वले त्याच्या पाठ लागली. तेंव्हा खड्डेमय रस्त्यातून वेगाने आपली दुचाकी पळवत त्याने आपला जीव वाचविला. मोठा पाऊस पडल्याने त्याचवेळी रस्त्यावरील साकवावर पाणी आले होते. त्यामुळे अस्वलाच्या भीतीने त्याने आपली दुचाकी तेथेच रस्त्याशेजारी लावून साकवा वरून चालत पैलतीर गाठला. त्यानंतर रस्त्याने 200 मीटर पर्यंत चालत गेला असता त्याला वाटेत लहान वासरांसह गवीरेड्यांचा कळप दिसला. गवी रेड्यांच्या कळपाने दिगंबरला पाहताच रागाने आपला मोर्चा त्याच्याकडे वळवला.

गवी रेडे मागे लागताच घाबरून पळत सुटलेल्या दिगंबर याने एका झाडावर चढून आपला जीव वाचविला. गवी रेड्यांचा कळप बराच वेळ दिगंबरकडे रागाने पहात झाडाखाली थांबून शेवटी तथून निघून गेला. त्यानंतर भयभीत झालेल्या दिगंबर याने आपली दुचाकी गाठली आणि पाणी ओसरलेल्या साकवा वरून तो परत माघारी खानापूरकडे निघाला.
परंतु हे करताना वाटेत एका गाईने त्याला मारण्यासाठी त्याच्या दुचाकीचा पाठलाग केल्यामुळे दुचाकी वेगाने पळवत त्याने कसेबसे खानापूर गाठले. या पद्धतीने अस्वलांचे व जंगली प्राण्यांचे हल्ले या अरण्य भागातील नागरी वस्तीतील नागरिकांवर वरचेवर होत आहेत. त्यासाठी वन खात्याने गांभीर्याने लक्ष देऊन जंगली प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.