बेळगाव लाईव्ह :
कर्नाटकच्या राजकारणातील गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना आणि राजकीय घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (CLP) नेतेपदी डी. के. शिवकुमार यांची एकमताने निवड करण्यात आली असून, त्यांच्या कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसौध येथे पार पडलेल्या काँग्रेस आमदारांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
विशेष म्हणजे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वतः या बैठकीत डी. के. शिवकुमार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला ज्येष्ठ नेते डॉ. जी. परमेश्वर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व आमदारांनी हात उंचावून डी. के. शिवकुमार यांच्या नावाला उत्स्फूर्त आणि एकमुखी पाठिंबा दर्शवला. आमदारांच्या मंजुरीनंतर, एआयसीसीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी डी. के. शिवकुमार यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली.
अशी पार पडली निवड प्रक्रिया:
बैठकीच्या सुरुवातीला एआयसीसीचे सरचिटणीस रणदीप सिंग सुरजेवाला यांनी नवीन नेत्याच्या निवड प्रक्रियेची रूपरेषा स्पष्ट केली. त्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधिमंडळ पक्षाचा नवा नेता निवडण्याचे अंतिम अधिकार काँग्रेस हायकमंडला (पक्षश्रेष्ठींना) देण्यात यावेत, असा एक ओळीचा ठराव मांडला. या ठरावाला मंजुरी मिळाल्यानंतर बैठकीत १० मिनिटांचा विराम घेण्यात आला.

या विश्रांतीच्या काळात मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के. सी. वेणुगोपाल आणि रणदीप सिंग सुरजेवाला यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या दालनात गुप्त खलबते झाली. या चर्चेनंतर सर्व नेते पुन्हा सभागृहात आले आणि शिवकुमार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
शिवकुमार यांच्याकडून सिद्धरामय्यांचे कौतुक:
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नवनिर्वाचित नेते म्हणून निवड झाल्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी मावळते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळाचा गौरव केला. सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आणि राज्याला दिलेल्या चांगल्या सेवांबद्दल कौतुक करणारा ठराव शिवकुमार यांनी मांडला, ज्याला संपूर्ण सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात मंजुरी दिली. पक्षश्रेष्ठींच्या या निर्णयामुळे बेंगळुरूमधील सत्तासंघर्षाचे ढग आता पूर्णपणे विरले आहेत.




