Tuesday, July 15, 2025

/

नाल्याचा बंधारा फुटला; शेतकऱ्यांचा तुटला;मिळाली अशी मदत

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कंग्राळी खुर्द येथील धोकादायक काळाघटा नाल्याचा बंधारा फुटून आज मंगळवारी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. या घटनेमुळे शेतकामासाठी नाल्याच्या पलीकडच्या बाजूला गेलेले सुमारे २५० ते ३०० लोक अडकून पडले होते. दरवर्षी पावसाळ्यात ही समस्या उद्भवत असल्याने, या नाल्याचा उंच बंधाऱ्यासह चांगल्या पद्धतीने विकास साधला जावा, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. ग्रामपंचायतीसह तालुका पंचायत च्या अधिकाऱ्याने देखील या ठिकाणची पाहणी केली.

बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द येथील काळाघटा नाला दरवर्षी पावसाळ्यात फुटून मोठ्या समस्या निर्माण करतो. शहरातील पाण्याचा निचरा याच नाल्यातून होत असल्यामुळे पावसाळ्यात हा नाला ओसंडून वाहत असतो. कंग्राळी खुर्द येथील शेतकऱ्यांसाठी आपल्या शेताकडे जाण्यासाठी हा नाला ओलांडण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही.

नाला ओलांडण्यासाठी पुलाची सोय असली तरी, पावसाळ्यात हा पूल पूर्णपणे पाण्याखाली जातो. या नाल्याची स्थिती इतकी धोकादायक आहे की, तो ओलांडताना एखादी व्यक्ती पाण्यात पडल्यास ती थेट मार्कंडेय नदीत वाहून जाण्याची भीती असते.

 belgaum

या नाल्याचे चांगल्या पद्धतीने बांधकाम करून विकास साधावा यासाठी गेल्या १० वर्षांपासून कंग्राळी ग्रामपंचायत आणि गावकरी प्रशासनाकडे साकडे घालत आहेत. त्याचप्रमाणे, स्थानिक आमदार व खासदारांकडेही अनेकदा अर्ज-विनंत्या करण्यात आल्या आहेत. मात्र, आजपर्यंत त्याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. विद्यमान आमदारांकडून नाल्याच्या बांधकामाचे टेंडर पास झाल्याचे आश्वासन दिले जात असले तरी, त्या अनुषंगाने कोणतीही प्रत्यक्ष कृती होताना दिसत नाही, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना कंग्राळी खुर्द येथील एक माजी ग्रामपंचायत अध्यक्ष म्हणाले की, गेल्या १० वर्षांपासून आम्ही काळाघटा नाल्याच्या विकासासाठी प्रयत्न करत आहोत. नाल्याची उंची वाढवून बंधारा मोठा करावा, अशी आमची मागणी आहे. याबाबत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना भेटून निवेदन दिले असून, त्यांनीही विकास कामाला मंजुरी मिळाल्याचे आश्वासन दिले आहे.

सध्याच्या या भयानक परिस्थितीमुळे शेतकरी अडकले असून, आम्ही २०० हून अधिक महिलांना सुरक्षित बाहेर काढले आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नाल्याचा विकास साधावा आणि मोठा पूल बांधावा. यासाठी आमदारांनी प्रयत्न करून लवकरात लवकर विकास कामाला चालना द्यावी, अशी गावकऱ्यांसह ग्रामपंचायतची कळकळीची विनंती आहे.

मुसळधार पावसामुळे धोकादायक काळाघटा नाल्याचा बंधारा फुटल्याने पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती उद्भवली. नाला फुटल्यामुळे पूल पाण्याखाली जाण्याबरोबरच, शेतकामासाठी पलीकडच्या बाजूला गेलेल्या सुमारे २०० ते ३०० लोकांचा गावाशी संपर्क तुटला होता. याबाबतची माहिती मिळताच गावकऱ्यांसह एपीएमसी पोलीस, ग्रामपंचायत सदस्य, पीडिओ आणि स्थानिक प्रमुखांनी नाल्याच्या ठिकाणी धाव घेऊन तातडीने मदतकार्य हाती घेतले. त्यांनी पलीकडे अडकलेल्या बहुतांश महिलांना प्रथम सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर उर्वरित लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे कार्य हाती घेण्यात आले.

दरम्यान, तालुका पंचायत अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोलून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच, नाल्याला आलेला पूर कमी होईपर्यंत कोणीही या परिसरात फिरकणार नाही, याची दक्षता घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.