बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि परिसराला सोमवारच्या संध्याकाळपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे, ज्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदा मान्सूनपूर्व पावसाने महिनाभरापूर्वीच जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे काही भागांत शेतीची कामे लवकरच सुरू झाली होती. मात्र, आता गेल्या दोन दिवसांपासून नियमित मान्सूनला सुरुवात झाल्याने विविध भागांतील शेतकरी अडचणीत आले आहेत. काही ठिकाणी अजूनही पेरणीची कामे खोळंबली असून, शेतकरी सध्या रोपांच्या लागवडीला प्राधान्य देत आहेत.
विशेषतः पेरणी झालेल्या भातशेतीत पाणी तुंबल्याने शेतकऱ्यांना धास्ती लागली आहे. सुमारे वीस ते पंचवीस दिवसांपूर्वी भाताची पेरणी करण्यात आली असून, सध्या भाताची रोपे अजून लहान अवस्थेत आहेत. अशा कोवळ्या रोपांमध्ये पाणी दीर्घकाळ साचून राहिल्यास ती कुजून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भातशेतीची शेते पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. जर पाण्याचा निचरा वेळेत झाला नाही, तर पेरणीसाठी केलेला खर्च वाया जाईल आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
केवळ भातशेतीच नाही, तर या अति पावसामुळे बटाटा आणि सोयाबीन पिकांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पाणी साचल्याने या पिकांची वाढ खुंटते, रोगराई वाढते आणि जमिनीतील पोषक तत्वे वाहून जातात.
यामुळे अपेक्षित उत्पादन घटण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. बेळगाव परिसरातील शेतकरी या अनपेक्षित पावसामुळे हवालदिल झाले असून, त्यांच्या नजरा आता पावसाच्या विश्रांतीकडे लागल्या आहेत.