बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि परिसरात सोमवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सोमवारी संध्याकाळपासून पावसाची रिपरिप कायम असल्यामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे.
न्यू गांधीनगर, वीरभद्रनगर, शिवाजीनगर आणि येडुरप्पा रोड यांसारख्या प्रमुख निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रांत पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे बेळगाव शहर ठप्प झाले आहे. लोक घराबाहेर पडायला कचरत असून, शाळा-महाविद्यालये आणि कार्यालयात जाणारे विद्यार्थी व नोकरदार वर्ग छत्री आणि रेनकोटच्या आधाराने मार्ग काढताना दिसत आहेत. बेळगाव जिल्हा प्रशासनाने पावसाचा जोर पाहून बुधवारचा एक दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जुन्या पी.बी. रोडवर तर पावसाच्या जोरदार माऱ्यामुळे रस्त्यावर पाणी साचले असून वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. लेंडी नाल्यातील पाणी त्या परिसरातील शेतीत पसरले असून त्या भागातील बहुतांश शेती पाण्याखाली गेली आहे.

पावसाळ्यापूर्वी गटारांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी वारंवार केली होती; मात्र, काही ठिकाणी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने रस्त्यांवर पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अनेक भाग जलमय झाले असून, गटारी तुंबल्याने रस्त्यावर पाणी आले आहे, ज्यामुळे अनेक रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले आहे.
स्वच्छतेअभावी गटारी पुन्हा तुंबल्याने नागरिकांचा महानगरपालिकेच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. दोन दिवसांच्या या पावसामुळे बेळगावकरांची अक्षरशः दैना उडाली असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.