बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त शुभा बी. यांनी मंगळवारी शहराचा विस्तृत दौरा करून मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शहरात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे ठिकठिकाणी गटारे आणि नाले तुंबल्याचे चित्र होते, ज्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता.
गेल्या दोन दिवसांपासून बेळगावात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे काही ठिकाणी नाले आणि गटारे कचऱ्यामुळे तुंबली होती. महापालिकेचे कर्मचारी ही तुंबलेली गटारे आणि नाले स्वच्छ करण्याच्या कामात युद्धपातळीवर गुंतले आहेत.
शाहूनगरमधील माउली गल्लीत पावसाने पडलेली झाडे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी येऊन तात्काळ हटवली. तसेच, भूमिगत गटारे आणि नाल्यांच्या नियमित स्वच्छतेसाठी तीन जेसीबी, दोन जेटिंग वाहने आणि सक्शन वाहने कार्यरत आहेत, जेणेकरून सांडपाणी रस्त्यावर येऊ नये आणि पाण्याचा निचरा सुरळीत राहावा.

मुसळधार पावसामुळे शहरात जागोजागी पाणी साचून मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, मनपा आयुक्त शुभा बी. यांनी अधिकाऱ्यांसह बेळगाव शहरातील सर्व सखल भाग आणि नाल्यांची स्वतः पाहणी केली. त्यांनी कर्मचाऱ्यांना तातडीने कामाला लागण्याचे निर्देश दिले.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महानगरपालिकेने तीन पथके तयार केली असून, कोणतीही समस्या उद्भवल्यास त्वरित प्रतिसाद दिला जाईल, असेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांच्या या कार्यतत्परतेमुळे संभाव्य मोठी हानी टळली असून, शहरातील पाणी निचरा यंत्रणा वेळेत कार्यान्वित झाली आहे.