बेळगाव लाईव्ह : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक आज पार पडली. सीमाप्रश्नाच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने नव्याने स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत महाराष्ट्र सरकारने उच्चाधिकार समितीसह तज्ज्ञ समितीची तातडीने पुनर्रचना करावी, अशी मागणी करण्यात आली, तसेच तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी माजी मंत्री जयंत पाटील यांची नियुक्ती करावी असा ठराव संमत करण्यात आला.
या बैठकीत बोलताना तालुका म.ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी महाराष्ट्र सरकारच्या नूतन उच्चाधिकार समितीचे अभिनंदन केले. या समितीने सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नाच्या याचिकेला गती देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

याच अनुषंगाने, उच्चाधिकार समितीच्या सोबतच तज्ज्ञ समितीची पुनर्रचना करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी माजी मंत्री जयंत पाटील यांची नियुक्ती करावी, असा ठरावही यावेळी एकमताने मंजूर करण्यात आला.
गेल्या वर्षभरापासून उच्चाधिकार समिती आणि तज्ज्ञ समितीच्या पुनर्रचनेसाठी प्रयत्न सुरू होते, आणि आता त्याला यश मिळाले आहे. यामुळे सीमाप्रश्नाची याचिका जलदगतीने पुढे सरकेल, असा विश्वास किणेकर यांनी व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज १३ जुलै रोजी पुन्हा सुरू होणार असून, त्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नासंदर्भात तातडीने बैठक घ्यावी, अशी विनंतीही मध्यवर्ती समितीने केली आहे.
या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांनीही आपले विचार आणि सूचना मांडल्या. या बैठकीला माजी महापौर मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, गोपाळ देसाई, एम. जी. पाटील, आर. एम. चौगुले, लक्ष्मण होनगेकर, विकास कलघटगी, आर. सी. मोदगेकर, मोनाप्पा पाटील, आर. के. पाटील, प्रसाद सडेकर, अमित पाटील यांच्यासह समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.