Wednesday, June 18, 2025

/

उ. कर्नाटक हितासाठी त्वरित थांबवा म्हादाईचे पाणी वळवणे – वनमंत्र्यांकडे मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :फक्त खानापूर तालुक्यातील भीमगड वन्यजीव अभयारण्य आणि मलप्रभा नदीला वाचवण्यासाठीच नव्हे तर संपूर्ण उत्तर कर्नाटकला वाळवंटीकरण आणि विनाशापासून वाचवण्यासाठी म्हादाई नदीचे पाणी वळवणे त्वरित थांबवावे आणि त्यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी पर्यावरणी फाउंडेशनने राज्याचे वनमंत्री ईश्वर खांड्रे आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे केली आहे.

तिवोली (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथील पर्यावरणी फाउंडेशनच्या एका शिष्टमंडळाने कॅप्टन नितीन धोंड, कर्नल रवेंद्र सैनी, गीता साहू, सुजित मुळगुंद आदींच्या नेतृत्वाखाली वनमंत्री खांड्रे आणि जिल्हा पालकमंत्री जारकीहोळी यांची नुकतीच भेट घेऊन उपरोक्त मागणीचे निवेदन त्यांना सादर केले.

कर्नाटक सरकार आणि भारत सरकार (एमओईएफ) यांच्यासाठी आम्ही सर्वांनी धारवाडचे दिवंगत लेफ्टनंट जनरल एस. सी. सरदेशपांडे यांच्या नेतृत्वाखाली 1997 ते 2011 पर्यंत सलग 15 वर्षे खानापूर तालुक्यातील पश्चिम घाटाच्या या प्रदेशाला वन्यजीव अभयारण्य म्हणून संरक्षित करण्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती गोळा करण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी आणि भू-क्षेत्रीय कामात समर्थन देण्यासाठी परिश्रम घेतले.

उत्तर कर्नाटकच्या पश्चिम-नैऋत्येकडील या जंगलमय भागाचे संरक्षण करण्याचे उद्दिष्ट खानापूर तालुका आणि उत्तर कर्नाटकची जल सुरक्षा आणि पर्यावरणीय सुरक्षा सुनिश्चित करणे होते. या प्रयत्नांना कर्नाटक सरकारने 2011 मध्ये जागतिक पर्यावरण दिनी कर्नाटकच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते परिसर मित्र पुरस्कार देऊन मान्यताही दिली. खानापूर तालुक्यातील मलप्रभेच्या पाणलोट क्षेत्रातील पावसासाठी ही जंगले जबाबदार आहेत.

या जंगलांमुळे होणाऱ्या मुसळधार पावसामुळे खानापूर हे दक्षिणेचे चेरापुंजी बनले आहे. नवलतीर्थ धरणात येणारे 80 टक्के पाणी हे खानापूर तालुक्यात होणाऱ्या पावसाचे आहे. बेळगाव, हुबळी-धारवाड, नरगुंद, नवलगुंद, रामदुर्ग, गदग इत्यादी ठिकाणांच्या जलसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भीमगड जंगलांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

भीमगड वन्यजीव अभयारण्यात उगम पावणारी म्हादाई नदी ही भीमगड वन्यजीव अभयारण्यासह त्याच्याशी संबंधित राखीव आणि संरक्षित जंगलांची आणि 1000 चौरस किलोमीटरच्या पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रांची जीवनरेखा आहे.

भांडुरा धरणाव्दारे म्हादई नदीचे प्रवाह वळवल्यास भांडुराचा संपूर्ण प्रवाह अभयारण्याकडे वळेल जो अभयारण्यासाठी मृत्यूची घंटा ठरेल. प्रवाह वळवल्यामुळे खानापूरमधील पावसावर पर्यायाने नवलतीर्थमधील पाण्यावर अपरिवर्तनीय आणि विनाशकारी परिणाम होईल. परिणामी उत्तर कर्नाटकला जलद वाळवंटीकरणाकडे ढकलले जाईल. आम्ही तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की म्हादाई नदीचे पाणी वळविण्यासाठी बांधलेले भांडुरा, कळसा आणि हलतारा धरणे ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोर नुसार पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील प्रदेश श्रेणीमध्ये आहेत.

गाडगीळ आणि कस्तुरीरंगन यांच्या अहवालानुसार यापूर्वी या धरणांच्या परिसराला पर्यावरणीयदृष्ट्या सर्वात संवेदनशील प्रदेश म्हणून ओळखले गेले आहे. एक सुशिक्षित अभियंता, तंत्रज्ञान-जाणकार आणि आमच्या जंगलाच्या संरक्षणाची खरोखर काळजी घेणारे म्हणून आम्ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो की तुम्ही उत्तर कर्नाटकला वाळवंटीकरण आणि विनाशापासून वाचवण्याच्या दीर्घकालीन हितासाठी म्हादाई नदीचे पाणी वळवणे त्वरित थांबवावे आणि त्याकरिता हस्तक्षेप करावा, असा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदनासोबत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोर आणि नॉर्वेजियन इन्स्टिट्यूट फॉर वॉटर रिसर्च यांचे अहवाल देखील जोडले आहेत. निवेदन सादर करतेवेळी कर्नल सैनी, साहू, मुळगुंद, कॅ. धोंड यांच्यासह नायला कोएल्हो, लिंगराज जगजंपी, अ‍ॅड. सुनीता पाटील, अमृत चरंतीमठ, अ‍ॅड. नीता पोतदार वगैरे पर्यावरणी फाउंडेशनचे अन्य सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.