बेळगाव लाईव्ह : संती बस्तवाड येथील धर्मग्रंथ विटंबने प्रकरणी निलंबित झालेले बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ यांच्या समर्थनात आणि त्यांचे निलंबन मागे घ्यावे, या मागणीसाठी बेळगावातील विविध हिंदू संघटनांनी संघटितपणे राणी कित्तुर चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन छेडून मोर्चाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
राणी कित्तुर चन्नम्मा सर्कल येथे आज सकाळी हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी धरणे सत्याग्रह करून निलंबित पोलीस निरीक्षक (सीपीआय) मंजुनाथ हिरेमठ यांचे समर्थन करत त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी केली.
यावेळी पोलीस निरीक्षक हिरेमठ यांच्या समर्थनार्थ तसेच त्यांच्यावरील अन्यायाच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यानंतर चन्नम्मा चौकातून मोर्चाने जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

अलीकडे हिंदू अधिकाऱ्यांना निलंबित केले जात आहे हे निषेधार्ह आहे. बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड येथे समाजकंटकांनी मशिदीमधील कुराण ग्रंथ जाळून त्याची विटंबना केली. मात्र तेंव्हा आजारी असल्यामुळे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ 15 दिवसांच्या रजेवर असताना देखील त्यांना निलंबित करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेली ही कारवाई कितपत योग्य आहे? ही कारवाई निषेधार्ह असून पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ झालेली कारवाई योग्य नाही. ज्यांनी चूक केली आहे त्या अधिकाऱ्यांवर ही कारवाई झाली पाहिजे.
आम्ही हिंदूंनी कोणत्याही अन्य समाजाशी स्वतःहून भांडण केल्याचा इतिहास नाही. कोणत्याही जाती-धर्माशी आम्ही संघर्ष केलेला नाही आम्ही सर्व धर्म समभाव मांणणारे असून दोषींवर कारवाई झाली पाहिजे. तेंव्हा राज्य सरकारने पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ यांच्यावरील निलंबनाची कारवाई तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा राज्यव्यापी उग्र आंदोलन छेडले जाईल, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.