बेळगाव लाईव्ह :छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज यांची समाधी असलेल्या चंद्रगिरी तालुक्यातील होदगेरे गावामध्ये त्यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून 5 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून कांही दिवसातच कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
बेळगाव तालुक्यातील सुळेभावी गावामध्ये काल रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नूतन मूर्तीचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. छ. शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि तत्त्वादर्श घेऊन आपण मार्गक्रमण केले पाहिजे. त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर आपण चालले पाहिजे.
सुळेभावी गावात कोणत्याही जाती धर्माचा, भेदभाव न करता प्रत्येक गोष्ट सर्वजण एकत्र येऊन करतात हे विशेष होय. छ. शिवाजी महाराजांचा लढा, आदर्श हे आमच्यासाठी प्रेरणादायक आहेत. मूर्ती उद्घाटनाच्या या कार्यक्रमांसारखे कार्यक्रम दिशादर्शक ठरले पाहिजेत. सुळेभावी गावासाठी हा ऐतिहासिक कार्यक्रम असून समाधानाचा विषय आहे. शिवरायांप्रमाणेच बुद्ध, बसवण्णा, डाॅ. आंबेडकर हे आमच्यासाठी आदर्श असले पाहिजेत असे म्हटले.

यावेळी महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी देखील समायोचीत मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. वेदमूर्ती प. पू. श्री श्रीशैल स्वामीजींच्या सानिध्यामध्ये पार पडलेल्या या छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती उद्घाटन समारंभास गावातील पंच, नेतेमंडळी आणि प्रतिष्ठित नागरिकांसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान होदगेरे येथील शहाजी महाराजांचे समाधी स्थळ गेल्या कित्येक वर्षापासून दुर्लक्षित असल्यामुळे सर्वत्र विशेष करून मराठा समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत होती. अलीकडे या समाधीस्थळाचा थोडाफार विकास झाला असला तरी त्याचा शाश्वत भव्य असा विकास केला जावा अशी मराठा समाजाची सातत्याची मागणी आहे.
आता खुद्द राज्याच्या सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शहाजी महाराजांच्या समाधी स्थळ विकासासाठी 5 कोटी रुपयांच्या अनुदानाची घोषणा केल्यामुळे मराठा समाजामध्ये समाधान व्यक्त होत असून आनंदाचे वातावरण पसरले आहे.