बेळगाव लाईव्ह:खानापूर तालुक्यातील जटगे परिसरात वाघसदृश्य वन्यप्राण्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा बैल ठार झाल्याची घटना घडल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून हल्ला नेमका कोणत्या वन्यप्राण्याने केला याची पडताळणी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जटगे येथील शेतकरी राजाराम पाटील यांचा बैल शेतालगतच्या भागात चराईसाठी सोडण्यात आला होता. यावेळी जंगलाच्या दिशेने आलेल्या वाघसदृश्य प्राण्याने बैलावर हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्यात बैलाचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत जनावराची पाहणी करून पंचनामा केला असून पाऊलखुणा व इतर पुराव्यांच्या आधारे हल्लेखोर प्राण्याची ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे. नुकसानभरपाईसाठीची प्रक्रिया देखील हाती घेण्यात आली आहे.

जटगे व परिसर हा जंगलालगतचा भाग असल्याने येथे वन्यप्राण्यांचा वावर वारंवार आढळून येतो. गेल्या काही महिन्यांत बिबट्या, अस्वल तसेच मोठ्या मांसाहारी प्राण्यांच्या हालचालींबाबत स्थानिकांकडून माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांनी जनावरे जंगलालगतच्या भागात नेताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर ग्रामस्थांनी जंगलालगतच्या भागात गस्त वाढविणे, कॅमेरा ट्रॅप बसविणे आणि वन्यप्राण्यांच्या हालचालींवर सातत्याने नजर ठेवण्याची मागणी केली आहे. बैलाच्या मृत्यूच्या घटनेमुळे जटगे परिसरात मानव-वन्यजीव संघर्षाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.




