बेळगाव लाईव्ह :
बेळगावमध्ये एका महिलेच्या खासगी आयुष्यातील क्षण टिपलेले फोटो तिच्या पतीला आणि नातेवाईकांना पाठवून मानसिक त्रास दिल्याप्रकरणी एका तरुणावर शहरातील ‘सीईएन’ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शिवमोगा जिल्ह्यातील शिकारीपूर तालुक्यातील इसूर गावचा रहिवासी असलेला सुनील अडगट्टी याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.
आरोपी आणि पीडित महिला गेल्या पाच-सहा वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. ओळखीचे रूपांतर जवळीकमध्ये झाल्यामुळे दोघेही शिवमोगा आणि हुबळीमधील विविध हॉटेल व लॉजमध्ये भेटत असत. याच दरम्यान, महिलेच्या नकळत तिचे काही खासगी फोटो आरोपीने आपल्या मोबाईलमध्ये काढले होते, असे तक्रारीत म्हटले आहे.
आरोपीने हे फोटो महिलेच्या पतीला, भावांना आणि इतर जवळच्या नातेवाईकांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवले. इतकेच नाही तर, महिलेच्या मोबाईलवर सतत संदेश पाठवून तिला धमकावणे आणि मानसिक त्रास देणे सुरू ठेवले होते. महिलेची बदनामी करणे आणि तिच्या गोपनीयतेचा भंग करणे हाच आरोपीचा मुख्य उद्देश होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सायबर गुन्हेगारी आणि महिलांच्या गोपनीयतेशी संबंधित हे गंभीर प्रकरण असल्याने, ‘सीईएन’ पोलिसांनी आरोपीवर विविध कलमांर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस आरोपीचा मोबाईल आणि सोशल मीडिया खात्यांची माहिती गोळा करून तपास करत आहेत.




