बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेच्या महसूल विभागातील सर्व कागदोपत्री कामकाज यापुढे ‘कागदविरहित’ होणार असल्याची माहिती महसूल विभागाचे उपायुक्त डॉ. सिद्धू हुल्लोळी यांनी दिली आहे.
गुरुवारी महापालिकेच्या महसूल कर्मचाऱ्यांसाठी आयोजित विशेष प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. महापौर, उपमहापौर, नगरसेवक आणि आयुक्तांच्या सहकार्याने महापालिकेचे महसूल वॉर्ड आता निवडणूक वॉर्डांमध्ये रूपांतरित करण्यात आले आहेत.
त्यानुसार पूर्वीच्या महसूल कर्मचाऱ्यांची नवीन वॉर्डांमध्ये पुनर्नियुक्ती करून कामांचे वाटप करण्यात आले आहे. यापुढे निवडणूक वॉर्डांमधील कर वसुली, पीआयडी आणि फेरफार यासारखी कामे ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहेत.

या पार्श्वभूमीवर सर्व विभागीय आयुक्त, महसूल अधिकारी आणि कर वसुली कर्मचाऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण देऊन सज्ज केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेला प्रशासकीय विभागाचे उपायुक्त उदयकुमार टी. यांच्यासह महसूल विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




