Wednesday, June 18, 2025

/

हिडकलच्या पाणीवाटपाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

 belgaum

बेळगाव लाईव्ह : हिडकल जलाशयातून धारवाड औद्योगिक क्षेत्रासाठी पाणी वळवण्याच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यातील मतभेद पुन्हा उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थगित केलेले काम गुपचूप सुरू झाल्याने काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये नव्या संघर्षाची चिन्हं दिसत आहेत.

बेळगाव जिल्ह्याच्या हिडकल जलाशयातून धारवाड औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करण्याची योजना काही महिन्यांपूर्वी तीव्र जनक्षोभामुळे थांबवण्यात आली होती. पिण्याच्या पाण्यासह औद्योगिक वापरासाठी मलप्रभा जलाशयातून आधीच ६.५ टीएमसी पाणी दिलं जात असताना, हिडकलमधून आणखी पाणी वळवण्याच्या प्रयत्नांना बेळगावकरांनी विरोध केला होता.

या विरोधाची दखल घेत मंत्री सतीश जारकीहोळी यांनी ही योजना थांबवली होती. मात्र, जलसंपदा खात्याचे प्रभारी असलेल्या उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी त्या योजनेला पुन्हा मंजुरी दिली आहे. त्यामुळेच हिडकलच्या पाणीवाटपावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळण्याची शक्यता आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार धारवाड केआयएडीबीने ३५० कोटी रुपयांची पाणी उपसा योजना तयार केली असून, ११० किमी लांबीची पाइपलाइन टाकून अर्धा टीएमसी पाणी वळवण्याचा प्रयत्न आहे. तीन महिन्यांपूर्वी ही कामं गुपचूप सुरू झाली होती. आता बैलहोंगल आणि गोकाक भागात पुन्हा जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने ही कामं जोमात सुरू आहेत. या सगळ्या प्रकारामुळे बेळगाव जिल्ह्यात पुन्हा जनक्षोभ उसळला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले, पाणीवाटप संदर्भातील आदेशांची माहिती मागवली जात असून याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच शेतकरी संघटनांशी चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

ही योजना केवळ औद्योगिक पाणीपुरवठ्यापुरती आहे, मात्र या प्रकल्पामुळे स्थानिकांना त्यांच्या हक्काच्या पाण्यापासून दूर ठेवले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे “आमचे पाणी, आमचा हक्क” अशी मागणी पुन्हा जोर धरते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.