बेळगाव लाईव्ह, विशेष : राज्यातील ग्रामपंचायतींना पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असताना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावपातळीवर पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. डिसेंबर २०२५ मध्ये निवडणुका होण्याची शक्यता गृहित धरून इच्छुकांनी तयारीला सुरुवात केली असून, गावकऱ्यांच्या मनोवृत्तीचा अंदाज घेण्यासाठी विविध युक्त्या अवलंबल्या जात आहेत.
पंचायत निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवारांची संख्या लक्षणीय असली, तरी अनेक इच्छुक उमेदवारी मिळवण्यासाठी स्थानिक तसेच जिल्हास्तरीय नेत्यांच्या गाठीभेटींना प्राधान्य देत आहेत. पक्षीय चिन्ह नसलेल्या निवडणुकीतही पक्षीय पातळीवरील रसद आणि रणनीती महत्त्वाची ठरत असल्याने या मोर्चेबांधणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
गावफेरी, जनसंपर्क अशाकार्यक्रमांतून मतदारांशी नातं जोडण्याचा प्रयत्न सुरु असून गावपातळीवर उत्सव, पूजाविधी, खेळ स्पर्धा, धार्मिक यात्रा अशा माध्यमांतून मतदारांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. विविध ‘सामाजिक’ कारणांनी आयोजित केलेल्या मेजवान्या, एकमेकांना भेटी, सांस्कृतिक कार्यक्रम या साऱ्यांतून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही इच्छुकांनी वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली स्थानिक कामे अचानक वेगात सुरू करून ‘कार्यसमर्थता’ सिद्ध करण्याची धडपड सुरू केली आहे.
गावातल्या मंदिरांपासून वाड्यांपर्यंत विविध मेजवान्यांची रेलचेल पाहायला मिळत असून, ‘देवाच्या नावाने’ होणाऱ्या या सोहळ्यांमागे राजकीय हेतू लपलेले आहेत, असा गावकऱ्यांचा सूर आहे. काही ठिकाणी तर या कार्यक्रमांत रंगीत पार्ट्यांचा शिरकाव झाल्याची कुजबुज आहे. या पार्श्वभूमीवर लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया वस्तुनिष्ठतेतून पार पडेल का, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
मागील निवडणुकीत अनेक गावांमध्ये उमेदवारांच्या घरासमोर काळी जादू, विचित्र चित्रविचित्र वस्तू ठेवण्याच्या घटना समोर आल्या होत्या. यंदाही काही भागांत जादूटोण्याच्या अफवा पसरू लागल्या असून, धार्मिक श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय आहे. हे चित्र लोकशाहीच्या आरोग्यास अपायकारक ठरू शकते.
ग्रामपंचायत निवडणुका ही केवळ सत्तेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया नसून, ती गावाच्या भविष्यासाठी दिशा निश्चित करणारी संधी असते. त्यामुळे इच्छुकांच्या घोषणांमागील वास्तव तपासून, त्यांच्या कृतींचा मागोवा घेऊन आणि भावनिक, धार्मिक अथवा आर्थिक प्रलोभनांना न भुलता मतदारांनी सुज्ञ निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या आधीच गावपातळीवर चैतन्य निर्माण झाले असून, पुढील काही महिने राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत.