बेळगाव लाईव्ह :शहरात साथीच्या रोगांचा फैलाव होत आहे. पण, डास प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेकडे पुरेशा फॉगिंग मशिन्स नाहीत. केवळ 12 मशिन्स आहेत. कर्मचारीही कमी आहेत. त्यामुळे लोकांच्या सोयीसाठी मशिन्स आणि कर्मचारी वाढवण्यात यावेत, अशी मागणी नगरसेवक रवी साळुंखे यांनी केली.
महापालिकेच्या सभागृहात शुक्रवारी आरोग्य विभागाची बैठक झाली. या बैठकीत पावसाळ्यात होणार्या संभाव्य अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अध्यक्षस्थानी महापौर मंगेश पवार होते.
शहरातील स्वच्छता निरीक्षक कमीत कमी 25 हवेत मात्र केवळ 12 स्वच्छता निरीक्षक कार्यरत आहेत याकडेही लक्ष देण्यात यावे अशी मागणी करत आगामी पावसाळ्यात होणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम आणि आरोग्यासाठी नगरसेवकांची समिती स्थापन कराव्यात पावसाळी समस्या सोडवाव्यात अशी मागणी देखील साळुंखे यांनी केली.
नगरसेवक शाहिदखान पठाण यांनी शहरातील कचरा उचल व्यवस्थित होत नाही. अनेक ठिकाणी ब्लॅकस्पॉट निर्माण झाले आहेत. त्यावर मोकाट कुत्र्यांचा वावर आहे. त्यामुळे अधिकार्यांनी ब्लॅकस्पॉट हटवल्याचा दिखावा न करता लोकांना त्रास होणार नाही, अशा प्रकारे कचरा उचल करावी, ब्लॅकस्पॉटवर नजर ठेवावी, असे सांगितले.

पर्यावरण अभियंते हणमंत कलादगी यांनी, शहर स्वच्छतेसाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी कचरा उचलीसंदर्भात सिंगल टेंडर मंजूर केले आहे, असे सांगितले. तर अनेक नगरसेवकांनी ठेकेदारांकडे पुरेशे मनुष्यबळ नाही. त्यामुळे वेळेवर कचरा उचल होत नाही. वारंवार सांगूनही कचरा उचल करण्यात येत नाही, असा आरोप केला.
गटारीवरील काँक्रिट काढा, फॉगिंग करा
शहरातील गटारींवर काँक्रिट घातल्यामुळे स्वच्छता करता येत नाही. त्यामुळे संबंधितांना नोटीस देऊन काँक्रिट काढायला लावा, अन्यथा ते फोडून काढा. डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी फॉगिंग करा, अशा सूचना या बैठकीत करण्यात आल्या.
या बैठकीत उपमहापौर वाणी जोशी, सत्ताधारी गटनेते हणमंत कोंगाली, विरोधी गटनेते मुजम्मील डोणी, नगरसेवक रवी साळुंखे, बसवराज मोदगेकर, अजिम पटवेगार, रियाज किल्लेदार, राजशेखर डोणी, गिरीश धोंगडी, रवि धोत्रे, श्रेयस नाकाडी, आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे, अभियंते आदिलखान पठाण, प्रविणकुमार खिलारे आदी उपस्थित होते.