बेळगाव लाईव्ह : केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या शिक्षण संस्थांवर ईडीने छापे टाकल्याचे प्रकरण काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाचे फलित असल्याचा आरोप केला. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी हे राजकारणात सामान्य असल्याचे सांगत संयम राखलेला सूर व्यक्त केला.
बेंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, “राजकारणात अशा घटना होत असतात. कोणीतरी दलित नेता आहे म्हणून ईडी कारवाई होते असे म्हणता येणार नाही, पण ही काँग्रेस पक्षाची बाब आहे. मी स्वतः परमेश्वर यांची भेट घेतली आहे. त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सर्व कागदपत्रे द्यायला त्यांनी आधीच सांगितले होते.”
मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना सतीश जारकीहोळी म्हणाले, “मी कोणताही काँग्रेसचा ‘महानायक’ नाही आणि सध्या मुख्यमंत्री पदासाठी दावेदारही नाही. मात्र, माझी इच्छा आहे की २०२८ मध्ये मी मुख्यमंत्री व्हावे. सध्या मी कुणावरही दबाव टाकत नाही, आमचं जे काही असेल, ते २०२८ मध्ये पाहू.”
रामनगरचे नाव बदलून ‘बेंगळुरू दक्षिण’ करण्यावरही सतीश जारकीहोळी यांनी प्रतिक्रिया दिली. “कोणताही सत्ताधारी शाश्वत नसतो, चक्र फिरत असते. डिप्टी सीएमने काही उद्देश ठेवूनच हे नावबदल केलं असेल. आमच्याही राज्यात नावे बदलले गेले आहेत, जसे की होसपेटेचे ‘विजयनगर’ करण्यात आले. उत्तर प्रदेशमध्येही अनेक शहरांची नावे बदलली आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसमधील अंतर्गत हालचाली, ईडी कारवाईवरून होणारे आरोप, मुख्यमंत्रीपदाची स्पर्धा आणि जिल्ह्यांच्या नावबदलावर मंत्री सतीश जारकीहोळी यांनी संयमित आणि राजकीय परिपक्वतेने उत्तर दिल्याने आगामी काळात काँग्रेसमध्ये सत्तासंघर्ष अधिक उफाळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
.