बेळगाव लाईव्ह:कावळेवाडी येथील उदयोन्मुख धावपटू प्रेम यल्लापा बुरुड याची राष्ट्रीय स्तरावर मद्रास रेजिमेंट वेलिंग्टनच्या लष्करी क्रीडा प्रशिक्षण केंद्रात खास खेळाडू म्हणून अभिनंदनीय निवड झाली आहे.
मद्रास रेजिमेंट वेलिंग्टन हे लष्करी क्रीडा केंद्र खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व विविध खेळात देशातील खेळाडूंनी देशाचे प्रतिनिधित्व करून आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करावी या हेतूने राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे.
जिद्द, चिकाटी असलेल्या देशातील निवडक खेळाडूंची या केंद्रात निवड केली जाते. अशा उच्च पातळीवरील क्रीडा केंद्रात प्रेम बुरुड याला मैदानी खेळात आपलं भविष्य उज्ज्वल करण्याची संधी मिळाली आहे.
प्रेम हा वयाच्या सहाव्या वर्षापासून धावण्याचा सराव करत असून सध्या त्याचे वय अवघे 13 वर्षे आहे. गेल्या सात वर्षात त्याने गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील विविध मॅरेथॉन स्पर्धेत पन्नास वेळा प्रथम क्रमांक आणि पंचवीस वेळा दुसरा क्रमांक प्राप्त करून आपले धावण्यातील प्रभुत्व सिद्ध केले आहे.
आता माध्यमिक विद्यालय कर्ले प्रशालेत इयत्ता आठवीत शिकत असताना त्याला राष्ट्रीय स्तरावरील लष्करी क्रीडा केंद्रांत शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे. ही त्याच्या आईवडिलांनी घेतलेल्या कष्टाची पोचपावती आहे. प्रेम याच्या या गरुड भरारीला वडील यल्लापा बुरुड यांनी गरीब परिस्थितीमध्ये घेतलेले अथक परिश्रम कारणीभूत आहेत.
मद्रास रेजिमेंट वेलिंग्टन लष्करी क्रीडा केंद्रातील प्रेम बुरुड याच्या निवडीमुळे अतिदुर्गम ग्रामीण भागातील खेळाडूही राष्ट्रीय स्तरावर झेप घेऊ शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. प्रशिक्षक एल.जी कोलेकर, योग्य मार्गदर्शन करणारे काका राजू बुरुड, वेळोवेळी आर्थिक सहकार्य करणारे वाय पी नाईक, आवश्यक क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणारे देणारे संतोष दरेकर यांच्यासह त्याच्या आईवडिलांनी घेतलेली मेहनत त्याचबरोबर गावातील लोकांचा, गुरूजनांचा आशीर्वाद -शुभेच्छा यामुळेच आज आपण हे यश प्राप्त करू शकलो असे आपल्या निवडीबद्दल बोलताना प्रेम बुरुड सांगतो.
येत्या 24 संप्टेंबर पासून तो मद्रास रेजिमेंट क्रीडा केंद्रामध्ये कार्यरत होणार असून त्यासाठी 22 सप्टेंबर रोजी बेळगावहून रवाना होणार आहे. लहान वयात मिळविलेल्या या उत्तुंग यशाबद्दल प्रेम बुरुड याचे सर्वत्र कौतुक होत आहे.