Thursday, October 10, 2024

/

गल्ली छोटी कीर्ती मोठी… सामाजिक संदेश देणारा देखावा

 belgaum

बेळगाव लाईव्ह:खास करून पर्यावरण पूरक श्री मूर्तीसाठी सुपरिचित असलेल्या माळी गल्ली येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने यंदा पर्यावरण पूरक देखावा आणि चिंचेच्या बियांपासून बनविलेली श्री गणेशाची एकदंताची मूर्ती सादर केली असून देखावा व मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची वाढती गर्दी होत आहे.

माळी गल्ली येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ हे अलीकडच्या काळात पर्यावरण पूरक श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून पर्यावरणाबाबत जनजागृती करणारे गणेशोत्सव मंडळ म्हणून सुपरीचीत झाले आहे. पर्यावरण संरक्षणाची बांधिलकी जपण्याबरोबरच या मंडळातर्फे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. मंडपाच्या दर्शनीय भागी बेळगावचा लंबोदर असा फलक असलेल्या या मंडळाच्या मंडपामध्ये प्रवेश केल्यानंतर पर्यावरण पूरक चिंचोक्यापासून बनवलेली श्री गणेश मूर्ती आणि ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश देणारा मुशकांचा अर्थात उंदरांचा देखावा पाहावयास मिळतो. मंडपातील “झाडे लावा झाडे जगवा, चला निसर्गाला वाचवू, किमान एक तर झाड लावा आणि त्याला जगवा” हा फलक लक्षवेधी ठरत आहे.

माळी गल्ली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची यंदाची श्री गणेश मूर्ती ही चिंचेच्या लाखो बिया अर्थात बिंचोकरे वापरून साकारण्यात आली आहे. त्यामुळे ही वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती तसेच देखावा पाहण्यासाठी भाविकांची वाढती गर्दी होत आहे.Mali galli

सदर मंडळाच्या एका पदाधिकाऱ्याने बेळगाव लाईव्हला माहिती देताना सांगितले की, आम्ही दरवर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यास प्राधान्य देतो. त्यानुसार यंदा देखील आम्ही प्रतिष्ठापना केलेली गणरायाची मूर्ती ही गवत, कागद, रट्ट यांच्यासह चिंचेच्या बियांपासून बनविलेली पर्यावरणपूरक मूर्ती आहे. उंदीर खात असलेल्या चिंचेतून पडलेल्या बी मधून श्री गणेश अवतीर्ण झाला असा ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश देणारा देखावा यावेळी सादर करण्यात आला आहे.

पीओपी मूर्तीला फाटा देऊन गेल्या कांही वर्षांपासून आम्ही पर्यावरण पूरक श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची नवी प्रथा सुरू केली आहे. याखेरीज आमच्या मंडळाकडून विधायक कार्य करण्याबरोबरच दरवर्षी रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, रद्दीतून बुद्धी वगैरे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.