बेळगाव लाईव्ह :आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीमूर्ती बनवण्याचे काम सुरू होणार आहे. शाडू माती दुर्मिळ झाल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून मूर्तिकार नाईलाजाने पीओपीच्या मूर्ती बनवण्याकडे वळला आहे. मूर्तिकार व त्याच्या कामगार वर्गाचा वर्षभराचा उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्यामुळे पीओपी मूर्तींवर बंदी न घालता पुणे महापालिके प्रमाणे विसर्जनानंतर पीओपी मूर्तींचे विघटन करून ते पुन्हा रासायनिक खत म्हणून उपयोगात आणण्याची योजना बेळगावमध्ये राबवावी, अशी मागणी वजा सूचना बेळगाव मूर्तिकार संघटनेने जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे केली आहे.
दरवर्षी बेळगाव शहर व ग्रामीण परिसरात परंपरेनुसार श्री गणेशोत्सव साजरा केला जातो. बेळगावातील सार्वजनिक गणेशोत्सवाला 100 हून अधिक वर्षाची परंपरा आहे. येथील मूर्तिकारांची आकर्षक मूर्ती कला हे बेळगाव शहर परिसराला लाभलेले एक वैभव आहे. पूर्वी त्यांच्याकडून सर्रास सर्व मूर्ती शाडूच्या बनवल्या जात होत्या. मात्र कालांतराने अलीकडे शाडू माती मिळणे कठीण झाले असल्यामुळे आणि मूर्तीच्या मागणीत वाढ झाल्यामुळे मूर्तिकारांना मूर्ती बनवण्यासाठी नाईलाजाने पीओपीचा आधार घ्यावा लागला आहे. या मूर्ती पर्यावरण पूरक नसल्या तरी महापालिकेच्यावतीने श्री विसर्जनाच्या 8 ते 10 दिवस आधी मानवनिर्मित कुंडात अथवा तलावात पाणी भरले जाते व विसर्जनानंतर 8 ते 10 दिवसांनी निर्माल्यासहित रिकामी केले जाते.
त्यामुळे मनुष्य आणि प्राण्यांच्या आरोग्यास धोका होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तथापी वर्षातून एकदा श्री गणेश विसर्जनामुळे प्रदूषणाचा धोका भेडसावत असेल तर पुणे महानगरपालिकेप्रमाणे प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींचे पूर्णपणे विघटन करून ते पुन्हा रासायनिक खत म्हणून उपयोगात आणण्याची योजना बेळगावात राबविली जाऊ शकते. याचा प्रशासनाने पाठपुरावा व अभ्यास करून जनतेला विशेष करून मूर्तिकारांना सहकार्य करावे. कारण मूर्तिकारांच्या वर्षभराचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. प्रत्येक मूर्तिकाराकडे कामगार वर्ग असतो या सर्वांचाच उदरनिर्वाहाचा प्रश्न आम्हाला भेडसावत आहे.
आजच्या युगात डॉल्बीच्या कर्णकश आवाजाने व फटाक्यांच्या आवाजामुळे मातीच्या मूर्तींना तडे जाऊन लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. तसेच शाडू मातीच्या मूर्ती नाजूक असल्यामुळे तडे जाण्याची संभावना असते. उदा. गेल्या 2016 च्या गणेशोत्सवा दरम्यान 7 फुटाची शाडू मातीची मूर्ती प्रतिष्ठापणे पूर्वीच दुभंगली होती. याचा प्रशासनाने विचार करावा. सालाबाद प्रमाणे श्री गणेश विसर्जनानंतर शुभमुहूर्तावर मूर्तिकारांना पुढील वर्षाच्या कामाची सुरुवात करावी लागते.
अद्याप ती सुरुवात झालेली नाही, अशा आशयाचा तपशील जिल्हा पालकमंत्री जारकीहोळी यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे. थोडक्यात मूर्तिकारांच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी कामाला सुरुवात करण्यापूर्वी बंदी न घालता पीओपी मूर्तीसंदर्भात योग्य तो निर्णय घेण्याची अप्रत्यक्ष विनंती बेळगाव मूर्तिकार संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
दरम्यान जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनाही पी ओ पी संदर्भात ठोस आश्वासन दिले असून परंपरे प्रमाणे गणेश उत्सव साजरा करा असे म्हटले आहे.यावेळी मध्यवर्ती गणेश मंडळाचे रणजित चव्हाण पाटील, रमाकांत कोंडूस्कर, सागर पाटील, विकास कलघटगी सतीश गौरगोंडा आदी उपस्थित होते.