बेळगाव लाईव्ह :बेळगावमधील चौथ्या रेल्वे गेट येथे सुरू असलेल्या अंडरपासच्या बांधकामामुळे सर्व वाहनांची वाहतूक तिसऱ्या गेट रेल्वे ओव्हरब्रिजवरून वळवण्यात आली आहे. या बदलामुळे विशेषतः वडगाव, भाग्यनगर आणि अनगोळहून उद्यमबागकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी लक्षणीय संपर्क निर्माण झाला आहे. तथापि यामुळे ओव्हरब्रिजवरील वाहतुकीचा ताण मात्र मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
उद्यमबाग परिसरातील उद्योग आणि महाविद्यालये सुरू होतात किंवा बंद होतात तेंव्हा गर्दीच्या वेळी तिसऱ्या गेट ओव्हरब्रिजवर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. बस, ट्रक, दुचाकी आणि खाजगी वाहनांच्या मिश्रणामुळे बेम्कोपासून दुसऱ्या गेटपर्यंतचा रस्ता वाहनांनी गजबजून जाऊन वाहनचालकांना अडथळ्यांना तोंड द्यावे लागते. वाहनांनी गजबजलेल्या रस्त्यामुळे परिस्थिती अधिकच गोंधळलेली बनलेली असते.
इच्छित स्थळी पोहोचण्याची घाई असल्यामुळे विशेषतः वेणुग्राम हॉस्पिटलजवळील ब्रिजच्या प्रवेशाजवळ दुचाकीस्वार अनेकदा ओव्हरटेकिंग आणि चुकीच्या बाजूने वाहन चालवतात. बेळगावमधील सध्याचा मुसळधार पाऊस आणि ओव्हरब्रिज येथील वाहनांच्या धोकादायक संचारामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

सदर मार्गावर ये-जा करणारे नागरिक आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जागरूक नागरिकांकडून पुढील प्रमाणे तात्काळ उपाययोजना सुचवण्यात आले आहेत. : कामाच्या दिवशी सकाळी 8 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हर ब्रिजवरील ट्रक आणि बसेससारख्या अवजड वाहनांची हालचाल मर्यादित करावी.
वाहतुक प्रवाहाचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बँको क्रॉस, फाउंड्री क्लस्टर आणि अनगोळ नाका सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलिस तैनात करावेत. स्थानिकांनी या पद्धतीने नियमन न केल्यास तिसऱ्या गेट ओव्हर ब्रिजवरील वाहतुकीचा वाढणारा ताण अपघातांना निमंत्रण देऊ शकतो. त्याचप्रमाणे विशेषतः विद्यार्थी आणि काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी विलंब होऊ शकतो. चौथ्या रेल्वे गेट येथील अंडरपासचे काम सुरू असल्यामुळे वेळेवर वाहतूक व्यवस्थापन केल्यास बेळगावच्या गर्दीच्या मार्गांवरील ताण कमी होऊ शकतो आणि सर्व प्रवाशांसाठी रस्ता सुरक्षितता वाढू शकते. या सर्व गोष्टींची अधिकारी दखल घेतील का?