बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या कॉलेज रोड वरील सरदार मैदानाच्या बाजूला असलेल्या फूटपाथवर सध्या चारचाकी वाहनांचे अतिक्रमण झाले असून प्रमुख रस्त्यावरील या बेकायदा पार्किंगकडे रहदारी पोलीस केंव्हा लक्ष देणार? असा संतप्त सवाल जागरूक नागरिक व पादचाऱ्यांकडून केला जात आहे.
वाहतूक नियमांच्या बाबतीत पोलीस प्रशासन सध्या काटेकोर झाले असले तरी बेळगावचे सर्वसामान्य तर सोडाच पण उच्चभ्रू सुशिक्षित वाहनचालकही त्यांना जुमानत नसल्याचे पहावयास मिळत आहे.
याचे उदाहरण म्हणजे सरदार मैदानाला लागून असलेला कॉलेज रोडचा फूटपाथ होय. गेल्या काही दिवसांपासून वाहतूक नियमांचे विशेष करून फूटपाथवर वाहने पार्क केल्यास अथवा वनवे नियमाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
स्वतः शहर पोलीस आयुक्तांनी तसा आदेश जारी केला आहे. तथापि सध्या शहरातील सुशिक्षित उच्चभ्रू वाहन चालकांकडून या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. कॉलेज रोड हा रस्ता शहरातील मुख्य रहदारीचा रस्ता आहे. तथापि याच रस्त्यावरील सरदार मैदानाला लागून असलेल्या फूटपाथवर चक्क चारचाकी गाड्या सर्रास पार्क केल्या जात आहेत.
या पद्धतीने शहरातील प्रमुख रस्त्यावर वाहतूक नियमाचे उल्लंघन होत असताना रहदारी पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिकात सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
सरदार मैदानाच्या ठिकाणी संपूर्ण फूटपाथ चारचाकी गाड्यांनी अडवल्यामुळे बिचाऱ्या पादचाऱ्यांना भर रस्त्यातून अपघाताचा धोका पत्करत ये-जा करावी लागत आहे. याची पोलीस आयुक्त आणि रहदारी उपायुक्तांनी दखल घेऊन त्वरेने योग्य ती कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी जागरूक नागरिक व पादचाऱ्यांकडून केली जात आहे.