बेळगाव लाईव्ह :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आयपीएस अधिकारी अलोकुमार यांना जीवे मारण्याच्या धमक्या देणारा आरोपी जयेश पुजारी याने हजेरीदरम्यान पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा दिल्याने बुधवारी बेळगाव न्यायालयात गोंधळ उडाला. यावेळी उपस्थित नागरिक व वकिलांनी आरोपी पुजारी याला चांगला चोप दिला.
जीवे मारण्याच्या गुन्ह्याखाली हिंडलगा कारागृहात असलेल्या जयेश पुजारी याला पोलिसांनी आज बुधवारी न्यायालयात हजर केले. आरोपी जयेश पुजारीला न्यायालयात हजर केले जात असताना त्याने वादग्रस्त घोषणा दिल्याने सर्वसामान्यत: गर्दी असलेल्या न्यायालयाच्या आवारातील चित्र पालटून गदारोळ उडाला.
आरोपी जयेश पुजारी याने हजेरीदरम्यान पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देताच संतप्त झालेल्या उपस्थित वकील व सर्वसामान्य नागरिकांची त्याच्याशी बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे पर्याय वकिलांनी व इतरांनी पाकिस्तान समर्थनार्थ घोषणाबाजी देणाऱ्या पुजारी याला चांगला चोप देण्यामध्ये झाले.
एपीएमसी पोलिसांनी त्वरीत हस्तक्षेप करून पुजारीला ताब्यात घेऊन सुव्यवस्था पूर्ववत केली. सदर घटनेनंतर काही काळ न्यायालय आवारात तणावाचे वातावरण होते. संतप्त जनता आणि वकिलांच्या तावडीतून जयेश पुजारी याची सुटका करून पोलिसांनी त्याला तात्काळ एपीएमसी स्थानकात नेले.
दरम्यान आयपीएस अधिकारी आलोक कुमार यांना देखील आज तुरुंगातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तुरुंगातून फोन करून जीव मारण्याची धमकी देणाऱ्या पुजारी याने न्यायालयात आपला अहवाल स्वीकारण्यास नकार देऊन पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या.
त्यामुळे आजचा गोंधळ उडाला. मात्र परिस्थिती अधिक चिघळण्यापूर्वी पोलिसांनी पुजारी याला ताब्यात घेतले.