बेळगाव लाईव्ह : दिवसागणिक वाढत चाललेल्या रहदारीच्या समस्या मार्गी लावण्यासाठी आज उत्तर रहदारी विभागाचे सीपीआय आर. एफ. नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटाओ मोहीम हाती घेण्यात आली होती. नेहमी गजबजलेल्या किर्लोस्कर रोड, मारुती गल्ली, गणपत गल्ली, शनिवार खूट, खडेबाजार, काकतीवेस यासह विविध ठिकाणची अतिक्रमणे हटविण्यात आली.
बाजारपेठेतील अनेक गजबजलेल्या ठिकाणी रस्त्यावरील विक्रेते, हातगाडी व्यावसायिक तसेच स्थानिक व्यापाऱ्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या उदभवत होती. अनेक ठिकाणी पार्किंगची समस्या डोके वर काढत असून रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्किंग करण्यात आल्याने वाहतूक कोंडीत अधिक भर व्हायची.
स्थानिक व्यापाऱ्यांनी जाहिरातीसाठी रस्त्यावर उभारलेले फलक, दुकानासमोर नो पार्किंगचे लावलेले फलक, यामुळे या समस्येत अधिकच भर होत होती. हि बाब लक्षात घेत आज उत्तर विभागाच्या रहदारी पोलिसांनी अतिक्रमण मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेदरम्यान सर्व व्यापारी आणि व्यावसायिकांना सूचनावजा इशारा देण्यात आला असून रस्त्यावर अतिक्रमण केल्यास साहित्य जप्त करण्यात येईल, असे सुचविण्यात आले आहे.
रहदारी पोलीस विभागाने हाती घेतलेल्या कारवाईमुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. परंतु या मोहिमेचा परिणाम किती दिवसांपर्यंत दिसून येईल, रहदारी विभागाने राबविलेल्या या मोहिमेतून स्थानिक व्यापारी,
रस्त्यावरील विक्रेते आणि हातगाडीवाले कोणता बोध घेतील कि पुन्हा ये रे माझ्या मागल्या असाच प्रकार होऊन पुन्हा रहदारीच्या समस्यांनी डोकेदुखी वाढेल, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. रहदारी विभागाने आपली जबाबदारी पार पाडली आहे. परंतु आता जागरूक नागरिक म्हणून नागरिक कोणती भूमिका घेतली हे पाहणेदेखील महत्वाचे ठरणार आहे.