बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहराला काल दुपारनंतर झोडपलेल्या वळीव पावसामुळे मोठ्या प्रमाणात तुंबलेल्या शिवाजी रोड, अंबा भुवन येथील नाल्याची सफाई करण्याचे काम महापालिकेकडून आज शनिवारी सकाळी युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले.
बेळगाव शहर परिसरात काल दुपारनंतर वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे गटारी, नाले तुंबून सांडपाणी रस्त्यावर येण्याद्वारे बहुतांश ठिकाणी अस्वच्छता पसरून दैना उडाल्याचे पहावयास मिळाले. पाटील मळा, शिवाजी रोड येथील नाला देखील मोठ्या प्रमाणात तुंबला होता.
त्याकडे स्थानिक नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ महापालिकेकडे पाठपुरावा केला. परिणामी आज शनिवारी सकाळी महापालिकेकडून जेसीबीच्या सहाय्याने शिवाजी रोड, अंबा भुवन या ठिकाणी तुंबलेल्या नाल्यातील गाळ व केरकचऱ्याचे उच्चाटन करण्यात आले.
यावेळी नगरसेविका वैशाली यांच्यावतीने बोलताना त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ भातकांडे यांनी यापुढे सदर नाल्याची वेळोवेळी स्वच्छता केली जाईल याकडे आम्ही लक्ष देणार आहोत असे सांगितले.
नाल्याची तात्काळ स्वच्छता करण्यात येत असल्यामुळे स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त होत होते.