बेळगाव लाईव्ह:बेळगाव सीबीटी ते धामणे (ता. जि. बेळगाव) गावादरम्यानच्या अपुऱ्या बस सेवेमुळे नागरिकांना विशेष करून विद्यार्थ्यांना उपलब्ध बसमध्ये दाटीवाटीने एकच गर्दी करून अक्षरशः लोंबकळत जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने धामणे गावासाठी अतिरिक्त बस सेवा सुरू करण्याची जोरदार मागणी होत आहे.
बेळगाव सीबीटी येथून धामणे गावासाठी बस सेवा आहे. मात्र ती अपुरी असल्यामुळे विशेष करून सकाळी आणि सायंकाळी शाळा कॉलेजच्या वेळेमध्ये या बसला प्रचंड गर्दी होत असते.
ही बस गर्दीमुळे कशी तुडुंब भरते, बसमधून शालेय विद्यार्थी कसे धोकादायकरित्या बसमध्ये चढतात, प्रवास करतात याची प्रचिती आज वडगाव रस्त्यावर आली. वडगाव येथे बेळगावहून धामणे गावाकडे जाणारी बस प्रवासी आणि विद्यार्थी -विद्यार्थिनींनी इतक तुडुंब भरली होती की त्यामुळे ती एका बाजूला कललेली पहावयास मिळाली. तसेच मार्गस्थ होताच कलल्यामुळे कोसळते की काय? असे वाटणाऱ्या या बसच्या दारात थांबलेले विद्यार्थी अक्षरशः लोंबकळत दाटी-वाटीने बसमध्ये सामावल्याचे दिसून आले.
या पद्धतीने विद्यार्थ्यांना दररोज जीवावर बेतणारा बस प्रवास करावा लागत असल्याबद्दल धामणे ग्रामस्थ आपल्या गावासाठी अतिरिक्त बस सोडण्याची वारंवार मागणी करत आले आहेत. मात्र अद्यापपर्यंत त्यांच्या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही.
तेंव्हा एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रशासन आणि परिवहन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धामणेवासियांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन धामणे गावासाठी तात्काळ अतिरिक्त बस सेवा सुरू करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे