Friday, December 27, 2024

/

बेळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी

 belgaum

दरवर्षी पडणाऱ्या दमदार पावसाने यंदा जून महिना संपत आला तरी हजेरी लावलेली नाही. पावसा अभावी भूगर्भातील पाणी पातळी घालवण्याबरोबरच खरीप पिकाचेही नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. हे लक्षात घेता सरकारने बेळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात पिकपाण्याला पोषक अशा दमदार पावसाला सुरुवात होते. मात्र यंदा मान्सून लांबून पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील बळीराजावर संकट कोसळले आहे. गेल्या मे महिन्यात खरीप हंगामाची तयारी करून शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र आता 1 जून पासून आजतागायत शेतीला म्हणावा तसा पूरक पाऊस पडलेला नाही.

बेळगाव शहर परिसरातील शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. यापैकी ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांची पिके कशीबशी तग धरून आहेत. मात्र जेथे पाण्याची सोय नाही अशा भागातील पिके नष्ट झाल्यात जमा आहेत. कारण पावसाअभावी बहुतांश पिके उगवलेलीच नाही आणि जी काही उगवली आहेत ती कोरड्या जमिनीला भेगा पडून सुकून जाण्याच्या मार्गावर आहेत.

यंदा म्हणावा तसा पाऊसच न पडल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी देखील 20 ते 30 फुटाने खालावली आहे. सदर पाणी पातळी उंचावून पूर्वपदावर येण्यासाठी आणि तग धरून असलेल्या पिकांना जीवदान मिळण्यासाठी सलग एक दिवस आणि रात्र सततच्या मुसळधार पावसाची आवश्यकता आहे. मात्र दुर्दैवाने सध्याचे वातावरण पाहता तशा पावसाची शक्यता कमीच आहे शिवाय तो पाऊस येईपर्यंत पिके पूर्णपणे नष्ट झालेली असणार आहेत असे जाणकारांचे मत आहे.Paddy crop

सध्या पावसाअभावी जमिनीला भेगा पडून भात वगैरे पिकांची रोप धोक्यात आली आहेत. जमिनीला पडलेल्या भेगा आणि पाण्याअभावी या रोपांची मुळे वाळल्यामुळे ती आता तग धरू शकणार नाहीत. या पद्धतीने पिकं नष्ट होणार असल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. पावसाने दडी मारल्यामुळे बेळगाव परिसरात निर्माण झालेली सध्याची परिस्थिती भाताच्या प्रमुख पिकासह खरीप हंगामातील रताळी, बटाटे, सोयाबीन, भाजीपाला आदी पिकांसाठी मारक ठरली आहे. बेळगाव परिसरात प्रामुख्याने बासमती, इंद्रायणीसह इतर भाताचे पीक घेतले जाते.

या पिकाची मे मध्ये पेरणी झाल्यानंतर 1 जूनपासून म्हणावा तसा पाऊसच झाला नसल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची बियाणं उगवलेलीच नाहीत. पावसाळा अभावी ती जमिनीतच नष्ट झाल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांच्यासमोर दुबार पेरणी खेरीज दुसरा पर्याय उरलेला नाही. त्यामुळे एकंदर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने बेळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि शेतकरी बांधवांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करावे अशी जोरदार मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.