बेळगाव लाईव्ह : दक्षिण भारत क्षेत्र मुख्यालयाच्यावतीने बेळगावच्या मद्रास रेजिमेंटल सेंटरतर्फे ‘शौर्य संपरव’ या कार्यक्रमाचा भाग म्हणून सशस्त्र दलातील माजी सैनिकांपर्यंत पोहोचण्यासाठी कारगिल हॉल, जेएल विंग, बेळगाव येथे आयोजित माजी सैनिकांसाठीच्या तक्रार निवारण मेळाव्याला (ईएसएम रॅली) आज शनिवारी उस्फूर्त प्रतिसाद लाभला.
सदर मेळाव्याचे अध्यक्षस्थान रेकॉर्ड्स विभागाचे प्रभारी आणि द मद्रास रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर कृष्णेंदु दास यांनी भूषवले. अध्यक्ष स्थानावरून त्यांनी उपस्थित बेळगाव, धारवाड, हुबळी, गदग आणि विजापूर (विजयपुरा) या जिल्ह्यांतील माजी सैनिकांना संबोधित केले.
कमांडंट दास माजी सैनिक, वीर नारी आणि त्यांच्या आश्रितांचे विशेषतः सशस्त्र दलांमध्ये आणि संपूर्ण राष्ट्रासाठी सेवेत असताना दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले. माजी सैनिक समुदायाचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी घटना कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी द मद्रास रेजिमेंट, वेलिंग्टनचे मुख्य रेकॉर्ड्स ऑफिसर लेफ्टनंट कर्नल कलाम सिंग यांनी प्रमुख पाहुण्यांचे आणि सर्व माजी सैनिकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे स्वागत केले. तसेच त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि विविध कल्याणकारी योजनांबाबत त्यांना शिक्षित करण्यासाठी रेकॉर्ड्स ऑफिस आणि मद्रास रेजिमेंट सेंटरकडून घेतलेल्या पुढाकारांची माहिती दिली. आज आणि उद्या आयोजित सदर मेळाव्यामध्ये 1,233 माजी सैनिक आणि वीर नारी उपस्थित आहेत.

मेळाव्यात आज विविध रेकॉर्ड्स कार्यालये आणि बँकांमधील अधिकाऱ्यांनी माजी सैनिकांच्या तक्रारींचे निराकरण केले आणि त्यांना उपलब्ध असलेल्या विविध कल्याणकारी योजना आणि सुविधांची माहिती दिली.
केएलई हॉस्पिटल, नेत्रदर्शन आय हॉस्पिटल, एमएच बेळगाव आणि ईसीएचएस पॉलीक्लिनिक, बेळगाव येथील डॉक्टरांच्या पथकांनी 689 रुग्णांची घटनास्थळी वैद्यकीय तपासणी आणि मदत केली. या मेळाव्याला ज्येष्ठ माजी सैनिक बांधवांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.