बेळगाव लाईव्ह : विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील १० महानगरपालिकांनी येत्या ८ जुलै रोजी पूर्ण दिवस बंदची हाक दिली आहे. याच दिवशी महानगरपालिकांचे कर्मचारी सामूहिक रजा घेऊन बेंगळुरूतील फ्रीडम पार्क येथे भव्य निदर्शन करणार आहेत, या निर्णयामुळे राज्यातील नागरी सेवा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बेळगाव महानगरपालिका आणि बृहत बेंगळुरू महानगरपालिकासह राज्यातील एकूण दहा महत्त्वाच्या महानगरपालिकांचे कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीतील सुधारणा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणे, आरोग्य सुविधा आणि इतर भत्त्यांसंबंधीच्या मागण्यांचा समावेश आहे.
महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी अनेक वेळा सरकारकडे आपल्या मागण्या मांडल्या आहेत, परंतु अद्याप त्यावर ठोस निर्णय झालेला नाही. यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी आता संपाचे हत्यार उपसले आहे. ८ जुलै रोजी सकाळीच बेंगळुरूच्या फ्रीडम पार्क येथे मोठ्या संख्येने कर्मचारी जमणार असून, तेथे जोरदार निदर्शने केली जातील.