बेळगाव लाईव्ह : शहराच्या पाणीपुरवठ्याची जीवनदायिनी असलेल्या राकसकोप जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी दुपारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली आहे. यामुळे, जलाशयाचे दोन दरवाजे उघडण्याचा तातडीचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, मार्कंडेय नदीकाठी संभाव्य पूरस्थितीचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
मागील २४ तासांपासून पावसाने धुमाकूळ घातल्याने राकसकोप जलाशयात पाण्याची मोठी आवक झाली. गुरुवारी सायंकाळपासून जलाशयाची पाणी पातळी २४७३.५० फुटांवर स्थिर होती. मात्र, शुक्रवारी सकाळीही तीच पातळी कायम राहिल्याने आणि पावसाचा जोर वाढत असल्याचे लक्षात घेऊन, सकाळीच वेस्टवेअरचे २ आणि ५ क्रमांकाचे दोन दरवाजे प्रत्येकी तीन इंचांनी उघडण्यात आले.
दुपारी १ वाजल्यापासून पावसाचा जोर आणखी वाढल्याने परिस्थिती बदलली. जलाशयाची पाणी पातळी वेगाने वाढून सायंकाळी ७ वाजेपर्यंत ती २४७३.७० फुटांपर्यंत पोहोचली. पाण्याची वाढती आवक पाहता, प्रशासनाला तातडीने कठोर निर्णय घ्यावा लागला. सायंकाळी ७ वाजता दोन्ही दरवाजे आणखी वाढवून ७ इंचांनी उघडण्यात आले. यामुळे मार्कंडेय नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे, ज्यामुळे नदीचे पाणी वाढून पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राकसकोप जलाशयाची पूर्ण साठवण क्षमता २४७५ फूट असून, ती गाठण्यासाठी आता केवळ एक फुटापेक्षा कमी पाण्याची आवश्यकता आहे. शुक्रवारी सकाळी ३५.१ मि.मी. पावसाची नोंद झाली, तर एकूण हंगामातील पाऊस १३६५.८ मि.मी. इतका झाला आहे. सध्या जलाशयातून होणारा पाण्याचा मोठा विसर्ग पाहता, मार्कंडेय नदी दुथडी भरून वाहण्याची चिन्हे आहेत.
जलाशय व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. पाण्याच्या आवकचा अंदाज घेऊन, आवश्यकतेनुसार आणखी दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे, मार्कंडेय नदीकाठावरील गावांना आणि वस्त्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.