belgaum

सिद्धरामय्यांची निवृत्ती नाही; पुढील निवडणुकीत प्रचार करणार – यतींद्र

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुढील विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे म्हटले असले, तरी त्याचा अर्थ त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली असा होत नाही, असे नगरविकास मंत्री यतींद्र सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.

बेळगाव येथील पर्यटन निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, सिद्धरामय्या यांनी पुढील निवडणूक न लढवण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, ते सक्रिय राजकारणात कायम राहून दुर्बल आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवत राहतील, अशी भूमिका त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. आगामी निवडणुकीत ते काँग्रेसच्या उमेदवारांसाठी राज्यभर प्रचारही करणार असल्याचे यतींद्र सिद्धरामय्या यांनी सांगितले.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, पक्षाच्या हायकमांडने मुख्यमंत्र्यांना दिल्लीला बोलावले असून, चर्चेनंतर योग्य निर्णय घेऊन मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल.

नगरविकास विभागाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आपण बेळगाव दौऱ्यावर आलो असल्याचे सांगत त्यांनी महापालिका आणि शहरातील विविध विकासकामांबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती दिली.

 belgaum

बेळगाव महापालिकेसाठी मुख्यमंत्री विशेष अनुदान स्थगित झाल्याबाबत विचारले असता, याबाबत संपूर्ण माहिती नसून याची पडताळणी करून माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, ज्या ठिकाणी निवडून आलेले लोकप्रतिनिधी नसतात, त्या ठिकाणीही केंद्र आणि राज्य सरकारकडून विकासासाठी निधी दिला जातो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेला मिळणाऱ्या विशेष अनुदानाबाबत विचारले असता, त्याबाबत सध्या आपल्याकडे माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. आढावा बैठकीत अधिकाऱ्यांकडून माहिती घेणार असून, राज्य सरकार किंवा मुख्यमंत्र्यांकडून येणाऱ्या अनुदानात काही अडचण असल्यास ती शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


बेळगाव शहरात एल अँड टी कंपनीमार्फत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामांमुळे अनेक रस्ते खोदण्यात आले आहेत. या कामांनंतर रस्ते पूर्ववत करण्याची संपूर्ण जबाबदारी एल अँड टी कंपनीचीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रस्ते दुरुस्तीचा खर्च हा मूळ पाणीपुरवठा प्रकल्पाच्या करारातच समाविष्ट असल्याने कंपनीने काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करणे बंधनकारक आहे. या विषयावर आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले.


राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारले असता, पक्षाच्या हायकमांडने मुख्यमंत्री सिद्धरामय्या, वरिष्ठ नेते आणि अन्य प्रमुख नेत्यांना चर्चेसाठी बोलावले असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीनंतर मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.