बेळगाव लाईव्ह: बेळगावच्या कॅम्प परिसरातील धोबी घाट तलाव (GLR Survey No. 129) येथे असलेल्या हॉकी मैदानाच्या सर्वांगीण विकासाला महत्त्वपूर्ण गती मिळाली आहे. खेळो इंडिया (Khelo India) योजनेअंतर्गत या मैदानाच्या उन्नतीकरणासाठी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाने तत्त्वतः (In-Principle) मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे बेळगाव आणि परिसरातील हॉकीपटूंना आधुनिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रस्तावित प्रकल्पांतर्गत मैदानावर आधुनिक सिंथेटिक (एस्ट्रो टर्फ) हॉकी मैदान, फ्लडलाइट्स, कार्यालयीन इमारत तसेच प्रेक्षकांसाठी गॅलरी उभारण्यात येणार आहे. यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) आणि खर्चाचा अंदाज तयार करून तो कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पुढील बैठकीत अंतिम मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर तो उच्चस्तरीय मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि हॉकी बेळगाव यांनी पुढाकार घेतला आहे. यापूर्वीच कॅन्टोन्मेंट बोर्डाने धोबी तलाव परिसरातील मैदान हॉकीसाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या मैदान मातीचे असल्याने खेळाडूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र एस्ट्रो टर्फ उभारल्यानंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार असून स्थानिक खेळाडूंना सरावासाठी अत्याधुनिक मैदान मिळणार आहे.
भारताने २०३६ ऑलिम्पिक स्पर्धांच्या यजमानपदासाठी तयारी सुरू केली असून केंद्र सरकारकडून विविध खेळांच्या पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशभरात आधुनिक क्रीडा संकुले आणि दर्जेदार मैदाने उभारण्यावर भर देण्यात येत आहे. हॉकी इंडियाच्या माध्यमातून भारतीय हॉकीला पुन्हा जागतिक स्तरावर अग्रस्थानी नेण्याचे प्रयत्न सुरू असून सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताने कांस्यपदकाची कमाई केली आहे. त्यामुळे देशभरात आधुनिक हॉकी मैदानांची गरज अधिक अधोरेखित झाली आहे.

हॉकीची समृद्ध परंपरा लाभलेल्या बेळगावने भारताला ऑलिम्पियन बंडू पाटील यांच्यासारखा खेळाडू दिला आहे. त्यामुळे या शहरात एस्ट्रो टर्फ मैदानाची उभारणी ही केवळ पायाभूत सुविधा नसून भविष्यातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
हॉकी क्षेत्रातील जाणकारांच्या मते, बेळगावमध्ये आधुनिक हॉकी सुविधा उपलब्ध झाल्यास जिल्ह्यासह उत्तर कर्नाटकातील अनेक युवा खेळाडूंना मोठी संधी मिळेल. त्यामुळे बेळगाव पुन्हा एकदा हॉकीच्या नकाशावर ठळकपणे झळकण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





