belgaum

खाजगी मालमत्ता की सार्वजनिक सुरक्षा? तलावाच्या मालकीचा तिढा कायम

0
278
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या कपिलेश्वर मंदिरामागील ऐतिहासिक तलावाची परिस्थिती आता अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बनली आहे. रविवारी दोन चिमुरड्यांचा बळी घेणाऱ्या दुर्दैवी दुर्घटनेनंतर आज सोमवारी पुन्हा या तलावाची दुसरी संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने, या दुसऱ्या घटनेवेळी परिसरात कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र, तलावाची भिंत सलग ज्या पद्धतीने कोसळत आहे, त्यामुळे या भागात असलेल्या घरांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.

रविवारी सकाळी पोहायला गेलेल्या शिवम सुंडीकर आणि परशुराम निलजकर या दोन मुलांचा अंगावर भिंत कोसळून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर प्रशासनावर चहुबाजूंनी टीका होत असताना, महानगरपालिकेने आता ‘डॅमेज कंट्रोल’ मोहीम हाती घेतली आहे. तलावाच्या चोहोबाजूंनी बॅरिकेड्स लावून या ठिकाणी नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली असून, तलाव परिसरातील अतिधोकादायक असलेली तीन घरे महापालिकेकडून तातडीने सील करण्यात आली आहेत.

याबाबत अधिक माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते कपिल भोसले म्हणाले, या परिसरात ४ ते ५ अशी घरे आहेत ज्यांच्या भिंतींना तलावाच्या ढासळत्या स्थितीमुळे मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. यामुळे या घरातील कुटुंबे आता दहशतीखाली असून तेथून स्थलांतरित होत आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून असलेला हा तलाव आणि त्याचा संपूर्ण परिसर गोडसे परिवाराच्या खाजगी मालकीच्या अखत्यारीत येतो. अनेक वर्षांपासून येथील भिंती पडण्याच्या स्थितीत असताना तत्कालीन लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदने देण्यात आली होती. मात्र, ही जागा खाजगी मालमत्ता असल्याचे कारण पुढे करत महानगरपालिकेने या ठिकाणी डागडुजी करण्यास नेहमीच नकार दिला. एकेकाळी येथे रस्त्याचे पुनर्निर्माण करण्यासाठी ४० लाख रुपये मंजूर झाले होते, पण अभियंत्यांनी जादा रकमेची निविदा दिल्याने तो प्रस्ताव बारगळला.

 belgaum

या प्रकरणातील सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे गोडसे परिवार आणि महानगरपालिका यांच्यातील ताळमेळाचा अभाव. तलावाची दुरवस्था आणि होणाऱ्या दुर्घटना पाहता हा तलाव मनपाकडे हस्तांतरित करून त्याचे पुनर्निर्माण करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, याच दरम्यान काही लोकांनी या तलावाची विक्री करण्याचा घाट घातला होता. काही विघ्नसंतोषी लोकांमुळे आणि मनपाच्या “खाजगी जागा” असल्याचे सांगून हात झटकण्याच्या भूमिकेमुळे हा तलाव आज मृत्यूचा सापळा बनल्याची खंतही कपिल भोसले यांनी व्यक्त केली.

कपिलेश्वर तलावाचा हा परिसर ऐतिहासिक असून येथे जागृत मंदिरे आहेत, जिथे भाविकांची मोठी वर्दळ असते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून हा तलाव देखभालीअभावी अत्यंत धोकादायक झाला आहे. वाहतुकीमुळे आणि जुन्या बांधकामामुळे भिंती कमकुवत झाल्या आहेत. आज या तलावाची मालकी खाजगी असली तरी, सर्वसामान्यांचे जाणारे बळी पाहता महानगरपालिकेने या वादात तातडीने हस्तक्षेप करावा आणि हा मालमत्तेचा तिढा सोडवून तलावाचे पुनर्निर्माण करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

रविवारी घडलेल्या दुर्घटनेत ज्या दोन चिमुरड्यांनी आपला जीव गमावला, त्यानंतर आता तरी प्रशासनाला जाग येईल का, असा संतप्त सवाल रहिवासी उपस्थित करत आहेत. सध्या खडेबाजार पोलीस आणि मनपा प्रशासनाने संपूर्ण परिसर बॅरिकेड्स लावून बंद केला असला, तरी या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार हा प्रश्न अजूनही कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.