belgaum

शहर म. ए. समितीच्या नेतृत्वासाठी पिराजी मुचंडीकर यांच्या नावाचा प्रस्ताव

0
696
 belgaum

बेळगाव लाईव्ह : सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असून, शहर समितीच्या रिक्त असलेल्या अध्यक्षपदासाठी पिरनवाडी विभागातून पिराजी मुचंडीकर यांचे नाव समोर आले असून पुन्हा शहर समितीच्या नेतृत्वाबाबत कार्यकर्त्यांमध्ये सध्या संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या निधनानंतर हे पद रिक्त आहे. समितीच्या घटनेनुसार शहराध्यक्ष हे पद अत्यंत जबाबदारीचे असून, सीमाप्रश्नी आंदोलनांची दिशा ठरवण्यात या पदाचा मोठा वाटा असतो. मात्र, गेल्या काही काळापासून शहर समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर न झाल्याने आणि अध्यक्ष निवडीचा पेच कायम असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे.

पिरनवाडी आणि मच्छे यांसारख्या बालेकिल्ल्यांमध्ये समितीचे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी तातडीने खंबीर आणि सक्रिय नेतृत्वाची गरज असल्याचे मत आता जोर धरू लागले आहे.

 belgaum

या पार्श्वभूमीवर पिरनवाडी, खादरवाडी आणि मच्छे परिसरातील कार्यकर्त्यांनी शहर समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर आणि मध्यवर्ती समितीच्या अध्यक्षांची भेट घेतली. पिरनवाडी विभाग समितीने पिराजी मुचंडीकर यांची बेळगाव शहर अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी आग्रही मागणी यावेळी केली.

पिरनवाडी ग्रामपंचायतीत सीमा प्रश्नावर ठराव मंजूर करण्यात आला आहे. तसेच पिरनवाडी-मच्छे परिसरात समितीचे वर्चस्व टिकवण्यात मुचंडीकर यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची तळमळ लक्षात घेता त्यांना शहराध्यक्ष पदाची संधी मिळावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

या भेटीदरम्यान कार्यकर्त्यांनी शहर समितीच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “शहर समितीचे अध्यक्ष कोण आहेत आणि ते बैठका का घेत नाहीत?” असे सवाल मच्छे-पिरनवाडी विभागाने पदाधिकाऱ्यांना विचारले. शहर समितीचे अस्तित्व दाखवण्यासाठी तातडीने सक्रिय नेतृत्वाची निवड करण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान यावर उत्तर देताना सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी , “जेव्हा समितीची बैठक बोलावली जाईल, तेव्हा रीतसर अर्ज सादर करता येतील” असे स्पष्ट केले आहे.

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये अंतर्गत गटबाजी आणि संवादाच्या अभावामुळे अध्यक्षपदाची निवड लांबणीवर पडली आहे. दीपक दळवींच्या निधनानंतर पुन्हा पदाचा प्रश्न निर्माण झाला असून नवीन नेतृत्वाच्या निवडीवरून कार्यकर्त्यांमध्ये असलेला हा असंतोष शहर समितीसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. आगामी काळात ही निवड प्रक्रिया पारदर्शक आणि लवकरात लवकर न झाल्यास सीमा लढ्यावर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून आगामी बैठकीत शहर समितीच्या नेतृत्वाचा तिढा सुटतो का, याकडे सीमावासियांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.