belgaum

कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात श्वान, एआयची साथ:

0
272
 belgaum

बेळगांव लाईव्ह :प्रशिक्षित श्वान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांचा मेळ घालणारे एक अभूतपूर्व वैद्यकीय नवोपक्रम बेळगावच्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये दाखल होणार असून ज्यामुळे एका साध्या श्वास चांचणीद्वारे कर्करोगाचे लवकर निदान होण्याची नवी आशा निर्माण झाली आहे.

‘क्लिनिकल ऑन्कोलॉजी’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका मोठ्या अभ्यासानंतर हे संशोधन समोर आले असून ज्यात संशोधकांनी दाखवून दिले की प्रशिक्षित श्वान श्वासाच्या नमुन्यांमधून 90 टक्के पेक्षा जास्त अचूकतेने कर्करोग ओळखू शकतात. या निष्कर्षांचे विशेषतः ज्या प्रदेशांमध्ये आरोग्यसेवा पायाभूत सुविधा मर्यादित आहेत, अशा ठिकाणी कर्करोग तपासणी अधिक सुलभ होण्यास मदत होणार असल्यामुळे स्वागत केले जात आहे.

कर्नाटकातील अनेक रुग्णालयांमध्ये केलेल्या या अभ्यासात कर्करोगग्रस्त रुग्ण आणि निरोगी व्यक्तींसह 1500 हून अधिक सहभागींचा समावेश होता. संशोधकांना असे आढळले की, ही पद्धत स्तन, फुफ्फुस, जठरांत्र, डोके व मान यांच्या कर्करोगासह विविध प्रकारच्या कर्करोगांना रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अचूकपणे ओळखू शकते. ही प्रक्रिया सोपी आणि बिनधोक असून यामध्ये व्यक्ती सुमारे 10 मिनिटे कापसाच्या मास्कमध्ये श्वास घेतात, जो नंतर सीलबंद करून त्याचे विश्लेषण केले जाते.

 belgaum

विशेष प्रशिक्षित श्वान कर्करोगाशी संबंधित चयापचय बदलांमुळे बाहेर पडणाऱ्या अस्थिर सेंद्रिय संयुगांच्या (होलेटाइल ऑरगॅनिक कंपाउंडस) रासायनिक खुणा शोधून नमुन्यांचे विश्लेषण करतात. त्यानंतर सुसंगतता आणि विश्वसनीयता सुनिश्चित करण्यासाठी प्रगत बायेसियन सांख्यिकी मॉडेल वापरून त्यांच्या प्रतिसादांवर प्रक्रिया केली जाते. पारंपरिक तपासणी पद्धतींच्या विपरीत या तंत्रामुळे रक्त तपासणी, स्कॅन किंवा उपवासाची गरज लागत नाही, ज्यामुळे ते विशेष करून मोठ्या प्रमाणावर सामुदायिक तपासणीसाठी योग्य ठरते.

सदर नावीन्यपूर्ण उपक्रमात आघाडीवर राहण्यासाठी बेळगाव आता एक महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाले आहे. केएलई रुग्णालय, लेकव्ह्यू रुग्णालय आणि जिल्हा आरोग्य प्राधिकरणांच्या सहकार्याने लवकरच वैद्यकीय चाचण्या सुरू होण्याची अपेक्षा आहे. या चाचण्यांमध्ये ग्रामीण आणि निमशहरी लोकसंख्येसह वास्तविक परिस्थितीत या तंत्रज्ञानाची परिणामकारकता तपासली जाईल. वैद्यकीय तज्ञांना या दृष्टिकोनात प्रचंड क्षमता दिसत आहे. केसीटीआरआय हुबळी येथील मुख्य कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. बी. आर. पाटील यांनी कर्करोगाची अनेक प्रकरणे प्रगत अवस्थेत निदान केली जाणाऱ्या भारतात लवकर निदान करणाऱ्या साधनांच्या तातडीच्या गरजेवर प्रकाश टाकला, त्यांनी नमूद केले की, श्वासावर आधारित निदान सांकेतिक (डिटेक्शन कोड) केवळ तपासणीचे साधन म्हणून काम करत नाही, तर उपचारांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यास आणि कर्करोग पुन्हा उद्भवल्यास लवकर ओळखण्यासही मदत करतो.

हे तंत्रज्ञान ‘डायग्नोसिस’ नावाच्या भारतीय स्टार्टअपद्वारे विकसित केले जात आहे, जे श्वानांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यासाठी आणि या उपायाचा विस्तार करण्यासाठी एआय प्रणालींना देखील एकत्रित करत आहे. जैविक शोध आणि मशीन लर्निंग यांचे संयोजन करून, ही कंपनी मोठ्या प्रमाणात नमुन्यांवर कार्यक्षमतेने प्रक्रिया करू शकते आणि संभाव्यतः दरवर्षी लाखो नमुन्यांची तपासणी करू शकते.

व्यापक अवलंब करण्यापूर्वी पुढील प्रमाणीकरणाची आवश्यकता असल्याचा सावध इशारा संशोधक देत असले तरी, बेळगावमधील आगामी चाचण्या कर्करोग निदानाच्या क्षेत्रात परिवर्तन घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्या यशस्वी झाल्यास, ही कमी खर्चाची आणि बिनधोक पद्धत कर्करोग लवकर निदान होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या सुधारू शकते आणि आरोग्यसेवा प्रणालींवरील भार कमी करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.