बेळगाव लाईव्ह : गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अनमोड घाटामध्ये दूधसागर मंदिराच्या खालच्या बाजूला गोवा हद्दीत महामार्गाच्या एका बाजूला भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे. येथे कोणत्याही क्षणी भूस्खलन होण्याचा धोका असल्यामुळे गोवा पोलिसांनी भेगा पडलेल्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून एकेरी वाहतूक सुरू केली आहे.
अनमोड घाटातून जाणारा बेळगाव -गोवा राष्ट्रीय महामार्ग हा कर्नाटक आणि गोवा राज्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. दरवर्षी पावसाळ्यात या घाटामध्ये दरड कोसळण्याचा धोका असतो. आता मुसळधार पावसामुळे अनमोड घाटात दूधसागर मंदिरापासून गोव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे 50 मीटर लांब भेगा पडल्या आहेत. परिणामी या रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे.
महामार्गाला भेगा पडल्याची माहिती मिळताच गोवा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन बॅरिकेड्स लावण्याद्वारे संबंधित रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू केली आहे. तथापि या एकेरी वाहतुकीमुळे अनमोड घाटात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली असून रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या पहावयास मिळत आहेत.
भेगा पडलेल्या रस्त्याच्या बाजूला दरी असून भूस्खलन झाल्यास हा रस्ता वाहतुकीस बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.