बेळगाव लाईव्ह : राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या ११ वा दीक्षांत समारंभ राज्यपाल थावरचंद गहलोत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सुवर्ण विधानसौधच्या सेंट्रल हॉल येथे पार पडला.
यावेळी बोलताना थावरचंद गहलोत यांनी मनोगत व्यक्त करताना, शिक्षणाचा उपयोग आपल्या व समाजाच्या विकासासाठी झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करणारे कर्नाटक हे पहिले राज्य आहे. देशातील युवा समाजाच्या विकासाला ते पूरक आहे. नवीन पदवीधरांनी आगामी काळात क्रीडा आणि कलेत स्वतःला झोकून देऊन शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असले पाहिजे तसेच पर्यावरण प्रदूषण आणि असमतोल व्यवस्थापनासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत, आत्मसात केलेले ज्ञान देऊन समाजाच्या विकासात हातभार लावावा आणि आजीवन विद्यार्थी या नात्याने ज्ञान संपादन करण्याचे विद्यापीठाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवावे, असे आवाहन केले. यावेळी कर्नाटक राज्य उच्च शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष डॉ. बी. थिम्मेगौडा, राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलपती प्रा. रामचंद्र गौडा यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी विद्यापीठातील विविध विभागात २७ पीएचडी , २६११ पदव्युत्तर आणि ४४४९८ पदविकासोबत ११ सुवर्ण पदके आणि १४९ रँक प्रदान करण्यात आले. यावेळी प्रा. मल्लेपुरम व्यंकटेश आणि दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.
बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री (मरणोत्तर) दिवंगत सुरेश अंगडी यांना समाजसेवेसाठी आणि प्रा. मल्लेपुरम जी. व्यंकटेश यांना “डॉक्टर ऑफ लेटर्स” ही मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांनी दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांना विद्यापीठाने जाहीर केलेली मानद डॉक्टरेट पदवी स्वीकारली .
या समारंभास राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या कुलपती राजश्री जैनापूर, कुलपती (मूल्यांकन) प्रा.शिवानंद गोरानाळे, वित्त अधिकारी प्रा. एस.बी.आकाश, सिंडिकेट आणि अॅकॅडमिक कौन्सिलचे सदस्य, विविध विभागांचे डीन, विभागप्रमुख, विद्यार्थी आणि पालक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.