बेळगाव लाईव्ह :हिंडलगा मध्यवर्तीय कारागृहामधील गैरप्रकारांनी बेळगाव पोलिसांची झोप उडवली आहे. कारागृहात सापडणाऱ्या मोबाईल फोन प्रकरणांची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास कार्य हाती घेतले आहे.
गेल्या दीड वर्षांत हिंडलगा कारागृहामध्ये 12 मोबाईल फोन सापडल्याची प्रकरणे घडली आहेत. या संदर्भात विशेष पोलीस तपास पथक स्थापण्यात आले आहे. या प्रकरणांचा छडा लावण्यासाठी पोलीस तांत्रिक साक्षीपुरावे गोळा करत आहेत.
पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांच्या निर्देशावरून बेळगाव ग्रामीण पोलीसांनी तपास कार्य वेगाने सुरू केले आहे. पोलीस तपासामध्ये कुविख्यात आरोपी जयेश पुजारी याचे नांव समोर आले असून त्याने एकट्यानेच 28 मोबाईल फोन वापरल्याचे एनआयए तपासात उघडकीस आले आहे. तसेच तो अतिरेकी संघटनांच्या संपर्कात असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
हिंडलगा कारागृहातून करण्यात आलेल्या एका अज्ञात फोनद्वारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकवण्यात आल्याच्या घटनेनंतर कारागृहात मोबाईल फोन सापडण्याच्या प्रकरणांना गंभीर वळण लागले आहे.
एनआयए च्या माहिती आधारे कारागृह अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये प्रकरण दाखल करून घेण्यात आले आहे. दुसरीकडे हिंडलगा कारागृहातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.




