Saturday, April 20, 2024

/

कर्नाटकाच्या कोल्हेकुईत अमोल कोल्हे यांनी सहभागी होऊ नये!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : ज्या महाराष्ट्रात सामील होण्यासाठी सीमाभागातील मराठी माणूस तळमळत आहे, अत्याचाराखाली भरडला जात आहे त्याच महाराष्ट्रातील नेतेमंडळींकडून सातत्याने मराठी माणसाच्या भावना पायदळी तुडवण्याचे काम केले जात आहे. बेळगावमध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमातील सहभाग असो किंवा कार्यक्रमामध्ये सीमावासियांची कदर न करता सीमावासियांच्या विरोधात असलेल्या राजकारण्यांसमवेत एकाच व्यासपीठावर बसणे असो किंवा थेट मराठीला डावलून कन्नड आणि कर्नाटकाचा उदो उदो करणे असो, या साऱ्यामुळे मराठी भाषिकांची मने दुखावण्याची कामे महाराष्ट्रातील अनेक नेतेमंडळी करण्यात धन्यता मानत आहेत. सध्या शिवप्रेमी, शिवभक्त, महाराष्ट्रप्रेमी आणि मराठीप्रेमी म्हणून ख्याती असलेले अभिनेते आणि राष्ट्रवादी पक्षाचे खासदार, नेते डॉ. अमोल कोल्हे यांनी अशाच पद्धतीचे वक्तव्य करून मराठी माणसाच्या भावनांना ठेच पोहोचवली आहे.

बेळगावच्या जनतेसाठी राजहंसगड हा मानबिंदू आहे. या गडावर प्रस्थापित करण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या मूर्ती अनावरणावरून दोन्ही राजकीय पक्षांमध्ये जोरदार तू – तू – मैं-मैं सुरु आहे. चढाओढीच्या स्पर्धेत उतरलेल्या या विषयात मुख्यमंत्र्यांचाही सहभाग दिसून आला. आणि २ मार्च रोजी शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण शासकीय कार्यक्रम म्हणून दर्शवून करण्यात आले. मात्र या कार्यक्रमात मराठी माणसाला कुठेच स्थान देण्यात आले नाही.

ग्रामीण मतदार संघाच्या आमदारांनी आपणच ही मूर्ती प्रतिष्ठापित केल्याचे सांगत उद्घाटनदेखील आपणच करणार असा अट्टहास धरून ५ मार्च रोजी पुन्हा याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शिवाय या कार्यक्रमात महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये खासदार अमोल कोल्हे यांचादेखील सहभाग असून या कार्यक्रमाच्या आवाहनासाठी त्यांच्याकडून मराठी मतांचे राजकारण करत, कार्यक्रमात बडेजावपणा आणण्यासाठी काही विधाने वदवून घेण्यात आली आहेत.

या आवाहनात अमोल कोल्हे यांनी बेळगावचा उल्लेख बेळगावी असा करत समस्त बेळगावकरांच्या भावना दुखावल्या आहेत. राष्ट्रवादीचे खासदार असले आणि सीमाप्रश्नी आघाडीवर असलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पक्षातील जबाबदार नेते असलेल्या अमोल कोल्हे यांना बेळगावसंदर्भात समज नसावी ही आश्चर्यचकित करणारी बाब आहे.

बेळगाव हे नाव बेळगावकरांच्या दृष्टीने सन्मानाची गोष्ट आहे. शासकीय दृष्ट्या जरी बेळगावचे नाव बेळगावी झाले असले तरी बेळगाव हेच नाव मराठी माणसाच्या मुखात आणि मना मनात आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडे देखील मागणी करण्यात आली आहे. मात्र उहापोह करताना ज्यापद्धतीने डॉ. कोल्हे यांनी विधान केले ते मराठी माणसाच्या मनाला दुखावणारे ठरले आहे. याचा मराठी माणसाकडून निषेध तर होईलच पण सच्चा मराठी, शिवप्रेमी-शिवभक्त आणि महाराष्ट्रप्रेमी म्हणवून घेणाऱ्या अमोल कोल्हे यांनी समस्त बेळगावकरांची जाहीर माफी मागावी अशी मागणी होत आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या विधानाबद्दल सीमाभागात निषेध तर व्यक्त होत आहेच त्याचबरोबर संताप आणि नाराजीही व्यक्त केली जात आहे. शिवाय ज्या गडावरील शिवमूर्तीसंदर्भात राजकारण केले जात आहे अशा कार्यक्रमात अमोल कोल्हे यांनी सहभागी होणे कितपत योग्य आहे.असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.