Saturday, April 27, 2024

/

आता लक्ष बंटी पाटील, संभाजी राजे आणि रितेश देशमुखांच्या भूमिकेकडे!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरून राजकीय घमासान सुरु आहे. २ मार्च रोजी येथे शासकीय शिष्टाचारानुसार कार्यक्रम पार पडला असून आता काँग्रेसकडून पुन्हा एकदा ५ तारखेला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेतेमंडळींना आमंत्रित करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे शिरूर मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हेदेखील उपस्थित राहणार होते.
यादरम्यान जनतेला आवाहन करताना त्यांनी बेळगावचा बेळगावी असा उल्लेख करून मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या होत्या. यानंतर सीमाभागात उसळलेली संतापाची लाट आणि जाहीर होणार निषेध हे पाहून डॉ. अमोल कोल्हे यांनी सीमावासीयांची माफी मागून दिलगिरी व्यक्त केली आहे.

राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीबाबत श्रेयवादावरून सुरु असलेल्या राजकारणात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला जात आहे, हि लाजिरवाणी बाब आहे. मात्र हा गोंधळ पाहून देखील महाराष्ट्रातील नेतेमंडळी आवर्जून उपस्थिती दर्शविण्यासाठी उतावीळ असल्याचे दिसून आले. खासदार अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करताना बेळगावचा उल्लेख बेळगावी असा केला. यावरून सीमाभागात व्यक्त होत असलेली नाराजी पाहून वेळीच त्यांनी पुन्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे सांगत समस्त सीमावासीयांची माफीही मागितली.

 belgaum

सीमावासीयांनी मूर्ती राजकारणाबाबत त्यांना माहिती दिली असता आपण या कार्यक्रमास हजर राहणार नाही, सीमावासीयांबद्दल माझी यापूर्वी जी भावना होती, तीच भावना यापुढेही कायम राहील, अशी ग्वाही दिली, आणि महाराष्ट्र धर्म पाळला.

राजहंसगडावरील कार्यक्रमात कोल्हापूरचे आमदार आणि माजी मंत्री बंटी पाटील, अभिनेते रितेश देशमुख आणि छत्रपती संभाजी राजे यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र या तिन्ही मान्यवरांनी देखील डॉ. अमोल कोल्हे यांच्याप्रमाणेच महाराष्ट्र धर्म पाळावा, अशी भावना सीमाभागात व्यक्त केली जात आहे. ज्याप्रमाणे डॉ. कोल्हे यांनी बेळगाव दौरा रद्द केला त्याप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनीही बेळगाव दौरा रद्द करून सीमावासीयांशी असलेली बांधिलकी जपून सीमावासीयांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी होत आहे.Amol kolhe

यापूर्वीही महाराष्ट्रातील राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांनी बेळगावमध्ये हजेरी लावली होती. विशेषतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी एकीकरण समितीच्या उमेदवाराविरोधात प्रचार केला होता. त्यावेळी सीमावासीयांनी त्यांनाही महाराष्ट्र धर्माची आठवण करून दिली होती.

सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावरून सुरु असलेले घमासान आणि मूर्ती विषयावरून तापलेले राजकारण हे पाहता, दुसऱ्यांदा उद्घाटनाचा कार्यक्रम आणि श्रेयवादाच्या लढाईत होत असलेला शिवरायांचा अवमान पाहून महाराष्ट्रातील मान्यवरांनी, नेतेमंडळींनी महाराष्ट्र धर्म पाळण्याची गरज असल्याची भावना सीमाभागात व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.