Thursday, April 18, 2024

/

सीमा लढ्यासाठीचे त्याग, बलिदान व्यर्थ जाता कामा नये -आम. रोहित पवार

 belgaum

महाराष्ट्रात सामील होण्यासाठी गेली 60-70 वर्षे सीमावासीय मराठी बांधव लढत असलेली लढाई असामान्य आहे. येथील मराठी माणसासोबत एका कुटुंबाप्रमाणे राहण्याची जबाबदारी प्रत्येक महाराष्ट्रीयन नागरिकाची आहे. सीमा लढ्यासाठी ज्यांनी त्याग व बलिदान दिले आहे ते व्यर्थ जाता कामा नये, असे महाराष्ट्रातील जामखेडचे आमदार रोहित दादा पवार म्हणाले.

बेळगावला आज मंगळवारी सकाळी अचानक दिलेल्या आपल्या भेटीप्रसंगी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी ते बोलत होते. बेळगावला मी लहानपणापासून येतो. बेळगावत माझे नातेवाईक आहेत आणि बेळगावत राहणारा प्रत्येक मराठी माणसाशी आमचं एखाद्या नातेवाईकाप्रमाणेच नातं आहे. आदरणीय पवार साहेब या ठिकाणी अनेकदा आले आहेत. येथील सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनी जो लढा आपल्या स्वाभिमानासाठी आपल्या अस्मितेसाठी लढला तो लढा सोपा नव्हता. अनेकांनी त्यासाठी मोठा त्याग केला आहे. स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची परवा न करता एक विचार या ठिकाणी टिकावा पुढच्या पिढीला मराठी भाषा आणि तिची अस्मिता कळावी त्यांच्या मनात राहावी यासाठी या सर्वांनी आणि यांच्या आधीच्या पिढीने लढा दिला आहे, असे आमदार पवार म्हणाले.

बेळगावला जसं आधी येत होतो तसंच आजही आलो आहे. या ठिकाणी येताना देखील मी आड मार्गाने न येता धडधडीत राष्ट्रीय महामार्गावरून आलो आहे. विविध ठिकाणी भेटी दिल्या आहेत. या ठिकाणी सर्वांना भेटल्यानंतर एक नवी प्रेरणा मला मिळते. आजही आपल्या सर्वांची अस्मितेची लढाई सुरू आहे. येथील मराठी माणूस गेली 60-70 वर्षे झाली महाराष्ट्रात सामील होण्यासाठी लढाई लढत आहे. महाराष्ट्रातही आज बघितले तर तेथेही अस्मितेची लढाई सुरू आहे. एक वेगळा विचार जो आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी आपल्या स्मितेचा तडा लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. एक सामाजिक कार्यकर्ता आणि महाराष्ट्रातील नागरिक या नात्याने मला एकच सांगायचे आहे की सीमा लढायासाठी ज्यांनी त्याग व बलिदान दिले आहे ते व्यर्थ जाता कामा नये. तसेच महाराष्ट्राला सुद्धा हा आपलाच भाग वाटतो ही आमचीच माणसे आहेत. या माणसासोबत एका कुटुंबाप्रमाणे राहण्याची जबाबदारी प्रत्येक महाराष्ट्रीयन नागरिकाची आहे. त्यांच्यावतीनेच मी हे वक्तव्य करत आहे, असे आमदार रोहित दादा पवार यांनी सांगितले.Rohit pawar hindlga

 belgaum

हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी भेट दिल्यानंतर आमदार रोहित दादा पवार यांनी सर्वप्रथम स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर सदर स्मारकाच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या हुतात्मा भवनासंदर्भात त्यांनी माहिती जाणून घेतली. मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर आणि खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी त्यांना नियोजित भवनाच्या आराखडा दाखवून त्या अनुषंगाने सर्व ती माहिती दिली. सदर माहिती जाणून घेऊन आमदार पवार यांनी नियोजित हुतात्मा भवनासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी त्यांना सीमालढया संदर्भातील पुस्तक भेटीदाखल देण्यात आले. मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, आर. एम. चौगुले,आर आय पाटील, मदन बामणे,धनंजय पाटील,महेश जुवेकर एम जी पाटील,किरण हुद्दार, मोतेश बारदेशकर आदी समितीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.