Thursday, April 25, 2024

/

आजच्या घडीला जनतेशी संवाद साधणे गरजेचे -आम. पवार

 belgaum

मी अशा (बेळगाव) ठिकाणी किंवा मंदिर वगैरे सार्वजनिक ठिकाणी जाताना प्रत्येकाला सांगत नाही. त्यामुळे राजकीय पदाधिकारीच आसपास राहतात. परिणामी जनतेशी संवाद साधता येत नाही. आज त्या संवादाचीच खरी गरज आहे, असे मत महाराष्ट्रातील जामखेडचे आमदार रोहित दादा पवार यांनी व्यक्त केले.

बेळगाव दौऱ्यावर आले असता आज मंगळवारी सकाळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या निवासस्थानी ते बोलत होते. आज अचानक दिलेल्या आपल्या बेळगाव भेटीप्रसंगी समिती नेते दीपक दळवी यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केल्यानंतर झालेल्या गप्पाटप्पा प्रसंगी बोलताना आमदार रोहित दादा पवार यांनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी बेळगावला आल्यानंतर आपण काय काय करायचो याची कांही उदाहरणे दिली.

मात्र आता राजकारणात आल्यानंतर कधीही काहीही करतो असे त्यांनी सांगितले. त्यावर दळवी यांनी कांही केल्याशिवाय परिस्थिती समजत नाही. त्यामुळेच तुम्ही आमच्या रिस्ट्रीक्टेड एरियात येत आहात. तुम्ही जे करता येते उत्तम आहे. त्यामुळे तुम्हाला लोकांची मते कळतील, आम्हाला हेच हवे आहे. कारण आम्ही तुमच्या काकांशी ते बोलू शकत नाही, कारण त्यांना आमच्यापेक्षा जास्त परिस्थितीचा अंदाज आहे, असे स्पष्ट केले.Rohit pawar dalvi

 belgaum

तुमचा संघर्ष मोठा आहे, असे यावेळी आमदार पवार यांनी दीपक दळवी यांना सांगितले. त्यावर आम्ही संघर्ष करत आलो आहोत आणि तो करताना कशीही टीका करतो, कसेही उद्वेगाने बोलतो. हे का बोलतो तर इथल्या लोकांना ज्यांनी समजून घेतलंय त्यांच्यामुळे त्यांना सर्व कांही कळतं. तुम्ही आम्हाला काही सांगितलं तर ते चांगलंच असणार यावर आमचा विश्वास आहे, असे शरद पवार यांच्या बाबतीत बोलताना दळवी यांनी सांगितले.

आपल्या आजच्या आकस्मिक बेळगाव दौऱ्याबद्दल थोडाफार सुचित करताना आमदार रोहित दादा पाटील म्हणाले की नुकतीच एक बैठक झाली. तेथे अमितराव आले होते. त्यानंतर काल मला अचानक फोन आला. माझं कसं असतं की मी अशा (बेळगाव) ठिकाणी जेंव्हा जायचं असतं तेंव्हा ते प्रत्येकाला सांगत नाही. त्यामुळे अडचण अशी होते की राजकीय पदाधिकारीच आसपास राहतात. त्यामुळे जनतेशी बोलता येत नाही. त्यामुळे मंदिरात किंवा गड किल्ले अशा सार्वजनिक ठिकाणी मी अचानक जातो. त्यामुळे जनता भेटते आणि एक वेगळी भावना अनुभवायला मिळते असे सांगून राजकीय पदाधिकारी बाउन्सर सारखे सोबत असले की जनता दूर राहते त्यांच्याशी हाय हॅलो होते, परंतु संवाद होत नाही आज या संवादाचीच खरी गरज आहे असे आमदार पवार यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी दीपक दळवी यांच्या समवेत माजी महापौर सरिता पाटील आणि म. ए. समिती महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर या उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.