Tuesday, July 23, 2024

/

रणकुंडये मंदिर वाद प्रकरणी 16 जणांना जामीन

 belgaum

रणकुंडये (ता. जि. बेळगाव) येथील मंदिराच्या जागेसंदर्भात गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वादा प्रकरणी नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यात रणकुंडये गावातील 16 जणांना बेळगाव द्वितीय जेएनएफसी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

रणकुंडये मंदिर वाद प्रकरणातील संबंधित आरोपींना यापूर्वी प्रधान जिल्हा न्यायाधीश मुस्तफा हुसेन यांनी अटकपूर्व सशर्त जामीन दिल्याप्रमाणे सर्व आरोपींनी आज द्वितीय जेएनएफसी न्यायालयासमोर हजर राहून जामीन घेतला. मारुती ईश्वर पाटील भावकाण्णा ईश्वर पाटील, यल्लाप्पा हरिबा पाटील पिराजी आप्पाजी पाटील, लक्ष्मण पितांबर पाटील, भारत कल्लाप्पा पाटील, प्रभाकर कल्लाप्पा पाटील, सचिन रमेश पाटील, अमित कृष्णा पावशे, संदीप भरमानी पाटील, बाळू उर्फ बलराम धाकलू पाटील, भास्कर यल्लाप्पा पाटील, कल्लाप्पा गावडू पाटील, हनुमंत दुष्यंत पाटील, निंगाप्पा कृष्णा पाटील आणि संजू उर्फ संजय परसराम पावशे (सर्व रा. रणकुंडये) अशी जामीन मंजूर झालेल्यांची नावे आहेत. 50 हजार रुपयांची वैयक्तिक हमी आणि त्याच किमतीचा जामीनदार या अटीवर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, असदखान सोसायटी बेळगाव येथील सय्यदमहमूद पाचासाब इनामदार यांची रणकुंडये गावातील आरएस नं. 132 व 133 मध्ये 9 गुंठे जागा आहे. सय्यदमहमूद त्यांचे वडील तसेच काका बाबाजान इनामदार, त्यांची काकू परविन बापूसाब इनामदार व नाहीदा बापूसाब इनामदार यांची ती वडिलोपार्जित मालमत्ता आहे.

आपल्या जागेमध्ये गावातील कांही हिंदू लोकांनी एका दगडाची पूजा करण्यास सुरुवात केली आहे अशी माहिती मिळताच गेल्या 20 ऑक्टोबर 2021 रोजी सय्यदमहमूद आपल्या वडिलांसह काकाचा मुलगा अंजुम बाबाजान इनामदार आणि अन्य एक नातलग उमर इकबाल अहमद सौदागर यांच्या समवेत रणकुंडये येथे गेले. तेंव्हा आपल्या मालकीच्या खुल्या जागेत दगड असलेल्या ठिकाणी मंदिराचे बांधकाम सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकाराला त्यांनी आक्षेप घेताच त्या दिवशी सायंकाळी 6:30 वा. सुमारास रणकुंडये गावातील 200 ते 300 लोक त्या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी इनामदार कुटुंबीयांना अर्वाच्य शिवीगाळ सुरू केली. त्यातून वादावादी होऊन त्याचे पर्यवसान इनामदार कुटुंबातील सदस्यांवर विळा, कुऱ्हाडी, काठ्या, लोखंडी राॅड आणि दगडांनी हल्ला करण्यामध्ये झाले. त्यामध्ये सय्यद महमूद रक्तबंबाळ झाले.Court

त्याचप्रमाणे उमर सौदागर, बाबाजान व पाचासाब यांना देखील जबर मारहाण करण्यात आली. त्यानंतर जमावाच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतलेल्या इनामदार कुटुंबीयांनी कोणीतरी मागविलेल्या 108 रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले. याप्रकरणी गावातील लोकांनी श्रीराम सेना व शिवसेना यांना पाचारण करण्याबरोबरच आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सय्यदमहमूद इनामदार यांनी बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंदवली आहे.

या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी प्रारंभी गावातील 200 ते 300 लोकांवर अज्ञात म्हणून गुन्हा नोंदविला होता. मात्र चौकशी व तपासाअंती 17 जणांवर भा.द.वि. 143, 147, 148, 323, 324, 307, 504, 506 आर /डब्ल्यू 149 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित 17 आरोपींनी जामिनासाठी केलेल्या अर्जावर सुनावणी होऊन आज सोमवारी त्यापैकी 16 जणांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. आरोपींच्यावतीने ॲड. सुधीर चव्हाण काम पाहत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.