Wednesday, April 24, 2024

/

सफाई कामगारांचा क्रीडा महोत्सव उत्साहात

 belgaum

तब्बल तीन वर्षानंतर बेळगाव महापालिकेतर्फे आज शुक्रवार 23 सप्टेंबर रोजी सफाई कामगार दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त सफाई कामगारांसाठी आयोजित क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला.

लोकनियुक्त सभागृह असताना 2018 मध्ये महापालिकेने सफाई कामगार दिनी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यानंतर 2019 साली अतिवृष्टी झाल्यामुळे व त्यानंतर सलग दोन वर्षे कोरोनामुळे या स्पर्धेचे आयोजन झाले नव्हते. मात्र यंदा सफाई कामगार दिन साजरा केला जात असून महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयानजीक असलेल्या पोलीस परेड मैदानावर आज सफाई कामगारांसाठी विविध स्पर्धांचा क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. सदर क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन महापालिका आयुक्त डाॅ. रुद्रेश घाळी यांच्या हस्ते आकाशात रंगबिरंगी फुगे सोडण्याद्वारे करण्यात आले. याप्रसंगी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांच्यासह पालिकेचे अन्य अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवक उपस्थित होते.

आपल्या समयोचीत उद्घाटनपर भाषणात आयुक्त डाॅ. घाळी यांनी सफाई कामगारांच्या कार्याचा गौरव करून शुभेच्छा दिल्या. सफाई कामगार दिनानिमित्त आज महापालिकेकडून सर्व सफाई कामगारांसाठी अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. पोलीस परेड मैदानावर पुरुष आणि महिला कामगार अशा दोन विभागात रस्सीखेच, संगीत खुर्ची, कबड्डी, खो-खो, लिंबू चमचा, धावणे, सुई दोरा, गोळा फेक वगैरे स्पर्धा घेण्यात आल्या. मिळालेल्या माहितीनुसार क्रीडा महोत्सवात सुमारे 1000 हून अधिक सफाई कामगारांनी भाग घेतला होता. महोत्सवातील विविध स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून आरोग्य निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. बक्षीस वितरण समारंभ कुमार गंधर्व रंगमंदिरमध्ये आयोजित करण्यात आला होता. महापालिकेचे सर्व स्त्री-पुरुष सफाई कामगार आज दिवसभर क्रीडा महोत्सवाचा मनमुराद आनंद लुटताना दिसत होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.