belgaum

इथे यात्री सुविधा दिनी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह:भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या देशव्यापी उपक्रमांतर्गत आज सोमवारी बेळगाव विमानतळावर ‘यात्री सुविधा दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रवासी सुविधांबाबतची कटिबद्धता अधोरेखित करण्याबरोबरच भारतीय संस्कृतीचा परिचय करून देणारे विविध कार्यक्रम आणि उपक्रम यावेळी आयोजित करण्यात आले.


कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी विमानतळ प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, कन्नड व संस्कृती खात्याचे प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. विमानतळ परिसरात आकर्षक पारंपरिक रांगोळी काढण्यात आली होती. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांचे कुमकुम तिलक लावून आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण विमानतळ परिसरात उत्साहाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते.


यात्री सुविधा दिनानिमित्त दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कर्नाटक कला व संस्कृती खात्याच्या वतीने भरतनाट्यम, संगीत आणि इतर सांस्कृतिक सादरीकरणे झाली. विविध शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी लोकनृत्य आणि आधुनिक नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. या सर्व कार्यक्रमांना प्रवासी आणि विमानतळ कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 belgaum


यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले. शिबिरात प्राथमिक आरोग्य तपासणी, आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि जनजागृती करण्यात आली. विमानतळावरील सुरक्षा अधिकारी आणि कर्मचारीदेखील या उपक्रमात सक्रिय सहभागी झाले होते.


कार्यक्रमाच्या समारोपावेळी विमानतळ कर्मचाऱ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून भारताचा नकाशा साकारत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. ‘वंदे मातरम्’ गीताने उद्घाटन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना बेळगाव विमानतळाच्या संचालकांनी सांगितले की, गेल्या दशकात नागरी उड्डाण क्षेत्रात आणि विशेषतः बेळगाव विमानतळावर झालेली प्रगती लोकांसमोर मांडण्यासाठी ‘यात्री सुविधा दिवस’ साजरा करण्यात येत आहे.

२०१७ मध्ये नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर उडान योजनेअंतर्गत १३ शहरांना विमानसेवा उपलब्ध झाली होती. सध्या बेळगाव विमानतळावरून नवी दिल्ली, मुंबई, नवी मुंबई, हैदराबाद आणि बेंगळुरू या प्रमुख शहरांसाठी नियमित विमानसेवा सुरू आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी कार पार्किंग, स्नॅक बार, स्वच्छतागृहे, बेबी केअर रूम, ग्रंथालय, मोफत वाय-फाय, वर्क स्टेशन आणि मोबाईल चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. प्रवाशांना अधिक आरामदायी आणि दर्जेदार अनुभव देण्यासाठी विमानतळ प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.