belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : सामन्यात असामान्य करण्याची ताकद असणे यात खरोखरच ईश्वरी देणगी असते. आपल्यासमोर कोणतीही आणि कितीही बिकट परिस्थिती असो परंतु ध्येयाने पछाडलेल्या ध्येयवेड्या व्यक्ती या सर्व परिस्थितीवर मात करून, आपल्यासमोर येणाऱ्या आव्हानांना निर्भीडपणे तोंड देत आपले यश गाठतातच. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे बैलहोंगल तालुक्यातील दोडवाड या गावातील गंगव्वा पडगुग्गरी!

bg

एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या गंगव्वा पडगुग्गरी या तरुणीने गॅझेटेड ऑफिसरपदापर्यंत झेप घेत अनेक तरुणींसमोर आदर्श निर्माण केला आहे. आई वडिलांचे शिक्षण कमी असूनही आपल्या मुलीने शिक्षणात कोणतीही कसर ठेवू नये यासाठी आपल्या मुलीला शिक्षणासाठी पाठबळ आणि प्रोत्साहन देत, अनेक स्पर्धा परीक्षांचे आव्हान पेलत, गंगव्वा पडगुग्गरी यांनी आपले ध्येय गाठले आहे. घरची परिस्थिती बेताची परंतु तरीही यातून मार्ग काढत सर्वोत्तम यश गाठत आजच्या तरुण पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे.

बेंगळूर येथे अर्थशास्त्र आणि सांख्यिकी संचालनालयात (इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिकस) सहाय्यक संचालिका म्हणून सध्या त्या कार्यरत असून या यशापर्यंत येण्यासाठी त्यांना यशाच्या अनेक पायऱ्या पार कराव्या लागल्या आहेत. केपीएससी परीक्षेच्या माध्यमातून ७ वा रँक मिळविलेल्या गंगव्वा पडगुग्गरी यांची नुकतीच या पदावर नियुक्ती करण्यात आली असून बेळगाव जिल्ह्यातील त्या एकमेव महिला उमेदवार आहेत.पोलीस विभाग, धारवाड येथे कॉन्स्टेबल, कारवार न्यायिक विभागात अन्न व औषध प्रशासकीय अधिकारी म्हणून त्या कार्यरत होत्या.Gagavva kas

केएएस सारख्या अनेक स्पर्धा परीक्षांचा टप्पा त्यांनी पार केला आहे. अर्थशास्त्र विभागात एमएपर्यंत शिक्षण घेतलेल्या गंगव्वा पडगुग्गरी यांचे बैलहोंगल येथील महिला महाविद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षण झाले आहे तर दोडवाड येथील सरकारी महाविद्यालयात पदवीपूर्व शिक्षण झाले आहे. दोडवाड येथील सरकारी शाळेत त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले असून पाच भावंडामधील एक असलेल्या गंगव्वा यांनी या पदापर्यंत येण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. या पदावर त्यांची निवड होण्यापूर्वी पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड झाली होती. या निवडीसंदर्भातील माहिती आणि आदेश त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर आपला आनंद गगनात मावेनासा झाला, असे त्या सांगतात.

यशाच्या या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला आपल्या आईचा खूप मोठा पाठिंबा मिळाला. तसेच सतत आपण अभ्यास करावा आणि यशाचे उत्तुंग शिखर गाठावे असे स्वप्न आपल्यासोबत आपली आईदेखील पाहायची, आईप्रमाणेच वडिलांचे प्रोत्साहन आणि पाठबळदेखील आपल्याला मिळाले आणि यामुळेच आपण इथवर पोहोचू शकलो असे गंगव्वा सांगतात.Gangavva

आजच्या तरुण पिढीने शॉर्टकट पद्धतीने यश न गाठता, यशाचे शिखर गाठण्यासाठी आशा आणि मेहनत कधीही सोडता कामा नये. आपल्याला कमी न लेखता आपल्यातील क्षमता ओळखून, आशा न सोडता ध्येयाच्या दिशेने निर्भीडपणे वाटचाल करावी, कोणतीही गोष्ट साधण्यासाठी अशक्य असे काहीच नसते त्यामुळे जिद्दीने आपली वाटचाल करावी, असा सल्लादेखील गंगव्वा पडगुग्गरी देतात.

आजच्या पिढीला अनेक सोयीसुविधा उपलब्ध असतात. परंतु शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी जिद्द, मेहनत आणि चिकाटी महत्वपूर्ण आहेत असा संदेश देणाऱ्या गंगव्वा पडगुग्गरी यांच्या आजवरच्या प्रवासाला सलाम आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा!

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.