Saturday, April 20, 2024

/

कोरे गल्लीतील ‘ही’ समस्या गंभीर; लक्ष देण्याची मागणी

 belgaum

कोरे गल्ली शहापूर येथील वारंवार निर्माण होणारी ड्रेनेज तुंबण्याची समस्या नागरिकांसाठी अत्यंत मनस्ताप देणारी ठरत आहे. तुंबलेला ड्रेनेजमुळे आसपासच्या विहिरी दूषित होत असल्याने लोकप्रतिनिधींसह मनपा अधिकाऱ्यांनी सदर समस्या तात्काळ दूर करण्याची मागणी केली जात आहे.

शहापूर कोरे गल्ली आणि जेड गल्ली यांच्यामध्ये असलेली ड्रेनेज पाईपलाईन गेल्या दोन वर्षापासून वारंवार तुंबत आहे. महिन्यातून एकदा ही समस्या उद्भवत असल्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. सदर ड्रेनेज पाईपलाईन जेड गल्ली चर्चाच्या मागील बाजूस असलेल्या चेंबरच्या ठिकाणी तुंबत आहे. गेल्या दोन महिन्यापासून सतत हा प्रकार घडत असून दरवेळी महापालिकेचे सफाई कर्मचारी येतात आपल्या परीने तुंबलेले ड्रेनेज स्वच्छ करण्याचा प्रयत्न करुन निघून जातात काल देखील सफाई कर्मचाऱ्यांनी तुंबलेल्या ठिकाणी ड्रेनेजची साफसफाई केली असली तरी ते आज पुन्हा तुंबून परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.

सदर ड्रेनेजमध्ये बरेच दिवस तुंबून राहिलेले सांडपाणी जमिनीत झिरपून आसपासच्या विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पूर्वी स्वच्छ निर्मळ असणारे या विहिरींमधील पाणी आता दुर्गंधीयुक्त गढूळ मातकट रंगाचे बनले आहे. घरगुती वापरासह पाणीटंचाईच्या काळात या विहिरीतील पाण्याचा वापर पिण्यासाठीही केला जातो. मात्र सध्या पाणी दुषित झाल्यामुळे या विहिरी कुचकामी ठरत आहेत. ड्रेनेज तुंबण्याचा या समस्येबाबत वारंवार तक्रार करून देखील मनपा अधिकाऱ्यांकडून त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. सदर समस्येचे युद्धपातळीवर निवारण न झाल्यास पावसाळ्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.Drainage

कोरे गल्ली येथील जागरूक नागरिक अभिजीत मजूकर यांनी परवा मनपा आयुक्तांना व्हाट्सअपवर तुंबलेल्या ड्रेनेजचा फोटो पाठवून या समस्येची माहिती दिली होती. त्यावेळी त्यांनी या समस्येकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आज मजूकर यांनी पुन्हा फोटोसह तक्रार केली मात्र आयुक्तांनी अद्याप प्रत्युत्तर दिलेले नाही. कोरे गल्ली ही प्रभाग क्र. 24 मध्ये येत असून या ठिकाणच्या  लोकप्रतिनिधीचेही या समस्येकडे साफ दुर्लक्ष झाले आहे.

जनसेवेसाठी निवडून दिलेले संबंधित महाशय असून नसल्यासारखे आहेत असे नागरिकांमध्ये बोलले जाते. तरी गेल्या दोन वर्षापासून भेडसावणाऱ्या या ड्रेनेजच्या समस्येकडे बेळगाव दक्षिणच्या आमदारांसह महापालिका आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष द्यावे आणि ही समस्या पावसाला सुरुवात होण्यापूर्वी तात्काळ सोडवावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.