उत्तम कामगिरी केली असल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे राज्याचे वन, आहार व नागरी पुरवठामंत्री उमेश कत्ती यांनी स्पष्ट केले आहे.
संकेश्वर येथील छ. शिवाजी महाराज जयंती उत्सवामध्ये सहभागी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वर्षभरात चांगली कामगिरी करून दाखविली आहे. त्यांच्या नेतृत्वावर भाजपच्या सर्व आमदारांचा ठाम विश्वास आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून कार्यरत आहेत.
त्याचप्रमाणे राज्यातील जनता देखील मुख्यमंत्री बोम्मई यांच्या कामगिरीवर खुश आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बदलण्याचा विषयच उद्भवत नाही. पक्षातील काही असंतुष्ट आमदार मुख्यमंत्र्यांच्या कार्यप्रणालीवर नाराज आहेत. त्यामुळे कांहींनी मुख्यमंत्री बदलाचा आग्रह चालवला आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते असंतुष्ट आमदारांशी चर्चा करून त्यावर तोडगा काढतील. तथापि मुख्यमंत्री बदलणार नाहीत, असे मंत्री कत्ती म्हणाले.
भाजपचे राष्ट्रीय सचिव संतोष बी. एल. यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला जात आहे. त्यांनी काय सांगितले आणि त्यांच्या विषयी काय सांगितले जात आहे, यावर भाजप हायकमांड गांभीर्याने विचार करत आहे. संतोष बी. एल. यांनी निष्क्रिय आमदार आणि मंत्र्यांविषयी वक्तव्य केले आहे. त्यांनी मुख्यमंत्री बदलाचा विषय कोठेच काढलेला नाही. कर्नाटकातील राजकीय घडामोडींवर भाजप हायकमांड बारीक लक्ष ठेवून आहे. त्यामुळे पक्षविरोधी कारवाया करणार्यांवर केव्हाही कारवाई होऊ शकते. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता असली तरी त्यात कोणाची वर्णी लागणार हे सांगता येणे कठीण आहे, असेही त्यांनी सांगितले.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे राजाला एक उत्तम मुख्यमंत्री लाभला आहे. कोणी काही सांगितले तरी सध्या तरी मुख्यमंत्री बदलाचा विषय नाही. राज्यातील विधानसभेची निवडणूक येत्या 7 -8 महिन्यात होत आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या 150 जागा भाजप पटकावून पुन्हा एकदा राज्यात एक हाती सत्ता प्रस्थापित करेल, असा विश्वासही मंत्री उमेश कत्ती यांनी व्यक्त केला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुर, संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गजानन क्वळ्ळी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनील पर्वतराव, नगरसेवक अमर नलवडे, सचिन भोपळे, गंगाराम भुसगोळ, प्रमोद होसमनी, विवेक क्वळ्ळी, पुष्पराज माने, सुभाष कासकर, अमोल गोंधळी, संदीप दवडते आदी उपस्थित होते.